
देशभरासह जगात कोरोना व्हायरसने घट्ट विळखा घातला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक देशांनी टाळेबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने भुईबावडा घाट तब्बल चार महिने बंद केला आहे. परंतु भुईबावडा घाटमार्ग बंद करून प्रशासनाने काय साध्य केले, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या मार्गावरून दिवसभर मोटारसायकलची ये-जा सुरूच आहे. प्रशासनाने घाटमार्ग बंद करण्याऐवजी भुईबावडा, उंबर्डे तसेच गगनबावडा या ठिकाणी पोलीस चेक नाका सुरू कराका, अशी मागणी केली जात आहे.
तालुका प्रशासनाने तब्बल तीन महिने भुईबावडा घाट बंद करून करुळ घाटमार्गे वाहतूक वळवली आहे. घाटात तीन ठिकाणी झाडे आडवी करून व मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद केला आहे. परंतु मोटारसायकलस्वार दररोज या घाटातून ये-जा करीत आहेत. मग प्रशासनाने घाटमार्ग बंद करून काहीही उपयोग झालेला नाही. तसेच आजारी रुग्ण असेल तर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर व अन्यत्र घेऊन जाण्यासाठी वरुळ घाटचा अवलंब करावा लागतो.
घाटमार्ग बंद करण्याऐकजी भुईबावडा येथे पोलीस दूरक्षेत्र येथील पोलीस ठेवून अवैध वाहतूक रोखता येऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी भुईबावडा घाटाचा वापर होतो. आता हा घाटमार्ग बंद करण्यामागे प्रशासनाचा नेमका उद्देश आहे, असा सवाल वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे.


























































