पक्ष्यांना दाणे टाकायला गेला; चोरट्यांनी लांबवली रिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा बिकट परिस्थितीत चोरी किंवा इतर संकटाचा फटका बसल्यास दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था होते. अशीच घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका रिक्षाचालकासोबत घडली आहे. एका प्रवाशाला सोडल्यानंतर त्याची रिक्षा चोरट्यांनी लांबवली. त्याने रिक्षात दैनंदिन खर्च, वीजबिल, महानगर बिल यांच्यासाठी 12 हजार रुपये ठेवले होते. रिक्षा चोरीला गेल्याने त्याचे दैनंदिन खर्चाचे रिक्षात ठेवलेले पैसेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे आता महिन्याचा खर्च कसा भागवायचा ही चिंता त्याला आहेच, त्याचसोबत उत्पन्नाचे साधन असलेली रिक्षाच चोरीला गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. जिग्नेश वाला (वय 24) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

जिग्नेश वाला हा नव वडाज येथे पत्नी आणि जुळ्या मुलांसह भाड्याच्या घरात राहतो. जिग्नेशने सकाळी वडाजहून मेमकोकडे प्रवाशाला नेले. प्रवाशाला सोडल्यावर सावरकर हॉलजवळ त्याला पक्ष्यांना खायला देणारी चबुतऱ्याची जागा दिसली. त्यामुळे पक्ष्यांना दाणे द्यावे, असा विचार जिग्नेशने केला. त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली आणि पक्ष्यांना खायला दाणे घेण्यासाठी सोबत काही पैसे घेतले आणि पाकीट रिक्षात ठेवले. पक्ष्यांसाठी दाणे विकत घेऊन पक्ष्यांना त्याने दाणे दिले. रिक्षा पार्क केलेल्या ठिकाणी आल्यावर रिक्षा गायब होती. आपली नजर चुकवून चोरट्यांनी रिक्षा लांबवल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच रिक्षात ठेवलेले पाकीट आणि 12 हजार रुपयेही रिक्षासोबत गेल्याने त्याची चिंता वाढली. त्याने तातडीने शहर कोठडा पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदवली. .

आपल्याला पाच महिन्यांची जुळी मुले आहेत. तसेच पत्नी आरोग्याशी संबंधित त्रास असल्याने तिची तब्येत ठीक नसते. त्यामुळे या चोरीने आपल्या उदरनिर्वाहाची समस्या उभी राहिल्याचे जिग्नेशने सांगितले. आपण स्वतःजवळ पैसे ठेवत नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च आणि इतर खर्चाचे पैसे रिक्षात सुरक्षित राहतील म्हणून आपण पैसे रिक्षात ठेवले होते. मात्र, चोरट्यांनी रिक्षाच लांबवली आहे, असे त्याने सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.