
देशभरात कोरोना विषाणूचा कहर अद्याप थांबण्याचे नाव नाही तोच आणखी एक भयंकर आजाराचा शिरकाव झाला आहे. याचा पहिला रुग्ण गुजरातमधील सुरत येथे आढळला आहे. येथील एका मुलाच्या शरीरात याची लक्षणे दिसून आल्यानंतर याचा खुलासा झाला आहे.
सुरतमध्ये आढळलेल्या या आजाराचे नाव मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) असे आहे. याला MIS-C असेही म्हणतात.
सुरतमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील 10 वर्षांच्या मुलामध्ये याची लक्षणे दिसून आली आहेत. विशेष म्हणजे हा आजार याआधी फक्त अमेरिका आणि युरोपियन देशात आढळून यायचा. मात्र देशात याचा पहिला रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाला ओकारी, खोकला, जुलाब होत असल्याने व डोळे व ओठ लाल पडल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सुरत येथे डॉक्टर आशिष गोटी यांनी मुलाची तपासणी केली असता त्यांनी त्याला सुरत आणि मुंबईतील अन्य तज्ज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घेण्यास सांगितले. अधिक तपासणी केल्यानंतर मुलामध्ये MIS-C ची लक्षणे दिसून आली. या आजारामुळे मुलाच्या हृदयाचे ठोके 30 टक्के कमी झाले आहेत. तसेच नसा देखील फुगल्या आहेत. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अखेर 7 दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले, मात्र हा आजार देशभरात पसरू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 3 वर्ष ते 20 वर्ष वयातील व्यक्तींना याचा धोका संभवतो, असे डॉक्टरांनी सांगितले. याची लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात यावे असेही डॉक्टर म्हणाले.






























































