
अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरपर्यंत घ्या अशी सक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केली असली तरी परीक्षा घ्यायच्या का नाहीत याबद्दल अजूनही देशातील 818 पैकी 603 विद्यापीठे संभ्रमात आहेत. दस्तुरखुद्द यूजीसीनेच यासंदर्भात विद्यापीठांची मते मागवली होती. त्यात अनेक विद्यापीठांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. काहींनी परीक्षा घ्यायचे ठरवले आहे तर काही त्या निर्णयाप्रत पोहोचलेली नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून यूजीसीकडून विद्यापीठांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचा अह वाल यूजीसीकडून जाहीरही केला जात आहे. आतापर्यंत यूजीसीने 755 विद्यापीठांची मते मागवली होती. त्यात 321 राज्य सरकारी विद्यापीठे, 274 खाजगी विद्यापीठे, 120 डिम्ड विद्यापीठे आणि 40 केंद्रीय विद्यापीठांचा समावेश आहे. दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेशांसह सहा राज्यांनी त्यांच्याकडे कोरोना परिस्थिती बिकट असल्याने परीक्षा घेण्यास नकार दर्शवला आहे.
194 विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या आणि 366 विद्यापीठे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये परीक्षा घेणार आहेत असे यूजीसीचे म्हणणे आहे. नव्याने स्थापन झालेल्या 27 खाजगी विद्यापीठांमधील पहिली बॅच अद्याप अंतिम वर्षाला पोहोचलेली नसल्याचे त्यांनी कळवले आहे.
31 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरुध्द 31 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्या याचिकांवर येत्या दोन दिवसांत सुनावणी होणार आहे. बहुतांश याचिकांमध्ये परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

























































