धारावी मुंबईला वाचवणार, ‘प्लाझ्मादान संकल्प अभियान’ सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एकवेळ सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीने आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. अत्यंत दाटीवाटीच्या परिसरातही शिस्तबद्ध उपाययोजना आखून कोरोनाला रोखता येते हे पालिकेच्या ‘मिशन धारावी’ने जगाला दाखवून दिले. हीच धारावी आता ‘प्लाझ्मादान संकल्प अभियाना’तून मुंबईला वाचवणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात आज धारावीत झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस साजरा करू नये, त्याऐवजी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन केले होते. पालिकेने राबवलेल्या मिशन धारावीनंतर आता मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी पालिका ‘प्लाझ्मादान संकल्प अभियान’ राबवले जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा कोरोना रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्याचा पालिकेच्या या मोहिमेचा उद्देश आहे. धारावीतील ‘कामराज मेमोरियल शाळे’त चार वर्गांत आजपासून रक्तचाचणी सुरू झाली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

500 जणांचा प्लाझ्मादान करण्यास होकार
– धारावीत आतापर्यंत 2100 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी 500 जणांनी प्लाझ्मादान करण्यास होकार दिला आहे. आतापर्यंत 60 जणांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून त्यापैकी 29 जण प्लाझ्मादान करण्यास पात्र ठरलेत. शीव आणि केईएम रुग्णालयांतील डॉक्टर रक्तचाचणी घेत असून सोमवारपासून प्रत्यक्ष प्लाझ्मादान मोहिमेला सुरुवात होईल, अशी माहिती जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

खासदार राहुल शेवाळे यांचा पुढाकार

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, खासदार राहुल शेवाळे यांनी ‘प्लाझ्मादान संकल्प अभियाना’साठी पुढाकार घेतला आहे. ‘प्लाझ्मादान संकल्प अभियाना’ला मोठा प्रतिसाद देत धारावीकरांनी मुंबईकरांची मने जिंकली आहेत. या अभियानात सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी जवळच्या शिवसेना शाखेशी किंवा 9321586566 या आमच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.

प्लाझ्मा कोण दान करू शकते?
18 ते 55 वर्षे वयाच्या कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती आणि ज्यांचा कोरोना बरा होऊन कमीत कमी 28 दिवस झाले आहेत अशा दात्यांच्या रक्ताची प्राथमिक तपासणी केली जाते. ज्या दात्यांना गंभीर आजार नाही असे दाते डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लाझ्मादान करू शकतात.