येरवडा पोलीस निरीक्षकांच्या पगारातून महिन्याला 10 हजारांची होणार कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन भावांच्या आत्महत्या प्रकरणात हलगर्जीपणा बाळगल्यामुळे विरारचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्याचे येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांच्या पगारातून सलग दोन वर्षे दर महिन्याला 10 हजार कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे. पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केला होता. विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या आणि केवळ नावात साम्य असलेल्या 3 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. पूर्वग्रहदूषित हेतूने शेख यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला. त्यामुळे विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 10 नोव्हेंबर 2017 मध्ये स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली होती. भावाला न्याय मिळावा यासाठी दोन महिने प्रयत्न केल्यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने 20 जानेवारी 2018 रोजी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाली. त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही, असा आरोप  त्यांच्यावर ठेवण्यात आला. अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले. शेख यांच्या विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष लक्षात घेऊन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

प्रकरणात झाली होती अटक

दोन्ही भावडांच्या आत्महत्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार सीआयडीने मार्च 2018 मध्ये शेख यांना अटक केली होती. याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय चौकशीचा अहवाल पुणे पोलिसांना पाठविण्यात आला होता. त्यानंतर ही शिक्षा सुनावली आहे.