दररोज दहा लाख कोरोना चाचण्यांचा संकल्प; मुंबईतील हायटेक लॅबचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय वैद्यक परिषदेने मुंबईसह कोलकाता, नोयडा या तीन ठिकाणी हायटेक लॅब सुरू केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे सोमवारी ऑनलाइन लोकार्पण झाले. सध्या देशात दररोज पाच लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या होत आहेत. आता दररोज दहा लाख चाचण्या करण्याची योजना असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

या ऑनलाइन लोकार्पण कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपेही सहभागी झाले होते. मुंबईत परळ येथील राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन केंद्रात (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ) चाचण्या होणार आहेत. या केंद्राचे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. सहा महिन्यांपूर्वी देशात एकही पीपीई किट तयार होत नव्हता. पण आजच्या घडीला देशातील 1 हजार 200 उत्पादक दररोज 5 लाखांपेक्षा अधिक पीपीई किटस तयार करीत आहेत. सध्या पीपीई किटस उत्पादनामध्ये हिंदुस्थान दुस-या क्रमांकावरील देश आहे. काही महिन्यांपूर्वी एन-95 मास्क आयात होत होते. आता दररोज तीन लाख एन-95 मास्क देशात तयार होत आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपण वेळीच पावले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखू शकलो. देशात दहा लाख लोक कोरोनातून बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत रोगप्रतिकार प्रयोगशाळा उभारणार; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे सहकार्याची मागणी

कोरोनाच्या या भयंकर साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले. महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

प्लाझ्मा थेरेपीचा फायदा

आज केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध आज तरी नाही, त्यामुळे सगळे जगच एक प्रयोगशाळा बनले आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर वीस दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. चेस दि व्हायरस परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत.कोरोनावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे राज्याने देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरु केला या थेरपीचा उपचारांमध्ये परिणामकारक उपयोग दिसू लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पीपीई किटस्चा पुरवठा करा

केंद्र सरकारने सप्टेंबरच्यानंतरही राज्यांना पीपीई किट्स आणि एन 95 मास्कचा पुरवठा करावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना केली. राज्यात जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्सचे टास्क फोर्स आणि ग्राम दक्षता समित्या स्थापन करून कोरोना विषयक जनजागृती करीत आहोत असे सांगितले. मार्च मध्ये राज्यात 2 प्रयोगशाळा होत्या. त्या आता 130 पर्यंत गेल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतर उपाय योजनांची देखील माहिती यावेळी दिली.