युवा क्रिकेटपटूंसाठी IPL पर्वणीच, मुंबईकर क्रिकेटपटू धवल कुलकर्णीचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाची आयपीएल स्पर्धा यूएईत होणार आहे ही बातमी कळताच आनंद झाला. हिंदुस्थानातील ही स्पर्धा हिंदुस्थानातीलच नव्हे, परदेशातील क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाची ठरते आहे. आपल्या देशातील असंख्य युवा क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्यासाठी ही स्पर्धा भक्कम व्यासपीठदेखील ठरते आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या साथीने क्रिकेटच्या मैदानात उतरून युवकांना आपल्या खेळामध्ये सुधारणाही याच स्पर्धेमुळे करता येते. एवढेच नव्हे तर या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱया सर्वांचाच आर्थिक प्रश्नही या स्पर्धेमुळे सुटतो, असे स्पष्ट मत मुंबईकर क्रिकेटपटू धवल कुलकर्णी याने दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना व्यक्त केले.

क्रिकेटपटूंना नियमांचे पालन करावे लागणार

कोरोनामुळे क्रिकेटमध्ये बदल होताहेत हे आपण इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यामधील कसोटी मालिकेत पाहतोय. रणजी स्पर्धेतील लढती चार दिवसीय असतात. तसेच स्थानिक स्पर्धांसाठी क्रिकेटपटूंना बराच काळ प्रवास करावा लागतो. लाल चेंडूला लाळ न लावता चमक आणणे मुश्कील आहे. तसेच प्रेक्षकांविना क्रिकेट खेळणे याचा विचारही करू शकत नाही. प्रत्येक खेळाडू हा क्रिकेट प्रेमींच्या प्रेमापोटीच खेळत असतो. त्यामुळेच थोडेसे अवघड असेल, पण कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करूनच क्रिकेट खेळायला हवे, असे धवल कुलकर्णीला वाटते.

मुंबई इंडियन्सकडून ऑनलाइन मार्गदर्शन

मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. तिथपासून जिम बंद असल्यामुळे फिटनेससाठी घरीच परिश्रम घ्यावे लागले. मुंबई इंडियन्सचे स्ट्रेंग्थ कंडिशनिंग कोच यांच्याकडून प्रोगाम्स तयार करण्यात आला. त्यानुसार घरामध्ये जिमची उपकरणं नसली तरी फिटनेस कायम राखता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा फायदाही झाला. तसेच याचदरम्यान मी रिफ्युजी व पार्ंकग एरियामध्ये सराव करीत होतो. जिममधील डम्बेल्स घरी घेऊन आलो होतो. त्यामुळे या काळातही फिटनेससाठी काहीच प्रॉब्लेम आला नाही, असे स्पष्ट मत धवल कुलकर्णी याने यावेळी व्यक्त केले.

मुंबईला रणजी, मुंबई इंडियन्सला आयपीएल जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन

दुखापतीला मागे टाकत क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा ठसा उमटवायचाय. मुंबईच्या क्रिकेट संघाला गेल्या काही मोसमात रणजी चॅम्पियन होता आले नाही. आता या वर्षी प्रतिष्ठsची स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन. तसेच आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करीन. शिवाय सर्वाधिक बळी गारद करीत पर्पल कॅप मिळवण्यासाठीही प्रयत्नशील असेन, असे धवल कुलकर्णी आत्मविश्वासाने म्हणाला.