
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वत्र मंदीचे वाताकरण असताना पश्चिम रेल्वेने रेल्वे रूळांच्या शेजारील पडलेल्या भंगार साहित्य, जुने कोच आणि कारखान्यातील लोखंड विकून जून महिन्यापासून आतापर्यंत 45 कोटींची कमाई केली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये ही भंगार विक्रीतून झालेली सर्वाधिक कमाई आहे.
पश्चिम रेल्वेच्या मेटेरिअल मॅनेजमेंट डिपार्टमेंटने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनानूसार पश्चिम रेल्वेच्या ट्रकशेजारी पडलेले निरूपयोगी रेल्वे रूळ, नादुरूस्त कोचेस आणि वर्कशॉपमध्ये पडलेल्या भंगार वस्तूंची एप्रिल आणि मे 2020 मध्ये वर्गीकरण करणे सुरू केले होते. त्यानंतर जून महिन्यापासून या भंगार साहित्याचा ऑनलाइन लिलाव करण्यास सुरूवात करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी स्पष्ट केले. दर महिन्यास दोन वेळा यासाठी लिलाव करण्यात आला. महालक्ष्मी, साबरमती, प्रतापनगर डेपो, मुंबई, वडोदरा, रतलाम, अहमदाबाद, राजकोट आणि भावनगर डिव्हीजनच्या भंगाराचा ऑनलाईन लिलाव करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
शंभर टक्के भंगार मुक्तीचे ध्येय
पश्चिम रेल्वेने आपला झोन शंभर टक्के भंगार मुक्त करण्याचे ध्येय रचले असून आतापर्यंत वर्कशॉप 100टक्के, स्टेशन 65टक्के, शेड आणि डेपो 50 टक्के आणि रेल्वे सेक्शन 30 टक्के भंगारमुक्त झाले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत पश्चिम रेल्वेने सर्व झोनमध्ये सर्वाधिक भंगारविक्रीतून 537 कोटी आणि 533 कोटीची कमाई केली आहे. यंदाच्या वर्षांअखेर आपल्या कामाच्या जागांना शंभर टक्के भंगारमुक्त करण्याचा पश्चिम रेल्वेचे ध्येय असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.





























































