
जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांचे भव्य मंदिर जन्मभूमी अयोध्येत साकारायला सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला होत असलेल्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळीसारखी तयारी सुरू करण्यात आली आहे. आखाडे-आश्रम सजू लागले आहेत. राम की पौडी रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाली आहे. दिवाळीत ज्या प्रमाणे दिव्यांची आरास करण्यात येते तशी आरास घराघरात करून भूमिपूजनाच्या दिवशी अयोध्येत दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान हनुमानगढी मंदिरात करणार प्रार्थना
राममंदिर भूमिपूजन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला हनुमानगढी मंदिरात पोहचतील. तेथे ते प्रार्थना आणि कोरोना नियंत्रणासाठी मंत्रोच्चार करतील, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी राजू दास यांनी दिली.
ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गावर नजर
भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गावर नजर ठेवण्यात येत आहे. अयोध्या दौर्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचा प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. तसेच कोविड प्रोटोकॉलही फॉलो केला जाणार आहे.


























































