
सम-विषम हा फॉर्म्युला रद्द करतानाच मुंबई महानगरपालिकेने बुधवार, 5 ऑगस्टपासून शहर-उपनगरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. ही दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली असतील. तसेच वाईन शॉपचे शटरही महापालिकेने उघडले असून आता तळीरामांना काऊंटरवरून बिनदिक्कत दारू घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत मुंबईतील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पण, त्यासाठी सम आणि विषम वारांचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. आज पालिका आयुक्त इकबालिंसह चहल यांनी हा फॉर्म्युला रद्द केला आणि सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी दिली. 5 ऑगस्टपासून मॉल्स, जिमखाने यांच्यासह दुकानेही आता उघडण्यात येणार आहेत. अर्थात मास्क आणि सोशल डिस्टिंन्सगची अट मात्र कायम असल्याचे आदेशात म्हटले आहे.
…गर्दी झाली तर वाईन शॉप मालकाविरोधात ‘एफआयआर‘
मुंबईतील वाईन शॉप उघडायला परवानगी दिल्यामुळे आता पूर्वीप्रमाणे काऊंटरवर दारू विकता येणार आहे. मात्र, गर्दी, आता मास्क, सोशल डिस्टिंन्सगचे नियम कठोर करण्यात आले आहेत. दुकानांसमोर गर्दी झाली, मास्क न वापरता विक्री तसेच सोशल डिस्टिंन्सग पाळले गेले नाही तर त्यासाठी दुकान मालकाला जबाबदार धरले जाणार असून त्याच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात येणार आहे तसेच ग्राहकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.





























































