
मुंबईतील एकूण 19 हजार 132 अॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल 13 हजार 296 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे रुग्ण लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत 9 ऑगस्टपर्यंत 96 हजार 586 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 78 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत 9 ऑगस्टपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 123397 झाली असली तरी यातील तब्बल 96 हजार 586 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता फक्त 19 हजार 932 अॅक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. याशिवाय 5 हजार 518 रुग्णांमध्ये कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे असली तरी त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, दीर्घ आजार, वयोवृद्ध अशा सुमारे 1118 रुग्णांची प्रकृतीबाबत जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबईत 9 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे 6 हजार 748 जणांचा बळी गेला आहे.
24 तासांत 15 हजार ‘हायरिस्क’ काँटॅक्ट शोधले
पॉझिटिव्ह रुग्णाच्या क्लोज काँटॅक्टमधील अतिजोखमीच्या संशयितांचा वेगाने शोध घेतला जात आहे. 9 ऑगस्ट रोजी मागील 24 तासांत तब्बल 15 हजार 38 जोखमीचे काँटॅक्ट शोधण्यात आले. यामध्ये 6 हजार 213 हायरिस्क तर 8 हजार 825 लो रिस्क संपर्क शोधून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

























































