
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती जैसे थे असून त्यांचा वेंटिलेटर सपोर्ट कायम ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील आर्मी रिसर्च ऍण्ड रेफरल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यांचे सर्व पॅरामिटर अद्याप स्थिर आहेत. तज्ञांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. 84 वर्षीय मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली व मेंदूमधील ब्लॉकेज हटविण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही ट्विट करून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नसली तरी त्यांची प्रकृती आणखी खालावलेली नाही असे सांगितले आहे. वडील दरवर्षी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवतात. पुढील वर्षी ते त्याच उत्साहाने तिरंगा फडकवतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.































































