
परभणीमध्ये मागील सहा दिवसापासून सलग रिमझिम पाऊस झाल्यामुळे काढणीला आलेल्या मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. मुगाच्या शेंगा काही ठिकाणी फुटून मोड निघाले असून यामुळे या खरीप हंगामात चांगले पीक येऊन सुद्धा शेतकर्यांच्या हाती फारसे काही पडणार नाही. परभणीसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यावेळी सर्वदूर पावसाची झड असल्याने आणि सूर्यदर्शन न झाल्याने मूगाच्या उत्पन्नात मोठी घट होणार हे निश्चित आहे.
यंदा सोयाबीन, तूर नंतर खरीप हंगामात शेतकर्यांचा ओढा मूग पेरण्याकडे असल्याचे दिसून आले. मृग नक्षत्रावर पडलेला पाऊस आणि त्यानंतर लगेचच झालेली पेरणी मूग पीकासाठी फायदेशीर ठरली. अगदी जोमात मुगाचे पीक आले. दोन महिन्याच्या कालावधीत येणार्या या पीकाला चांगली फुले येऊन शेंगाही धरल्या. परंतु मागील आठवड्यात जो सलग पाऊस झाला त्यामुळे मुगाचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी मुगाच्या शेंगाला मोडे आलेली दिसून आली. काही ठिकाणी अती पाण्यामुळे आणि निचरा न झालेल्या शेतात मुगाचे पीक पिवळे पडले. सतत ढगाळ वातावरण आणि रिमझीम तर कुठे सरी कोसळणार्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले मुगाचे पीक वाया गेले. बाकी पीकांना मात्र हा सलग पाऊस फारसे नुकसान करू शकला नाही. फळबागांना सुद्धा हा पाऊस पोषक राहिला. नुकसान झाले मात्र मुगाचे. काही ठिकाणी मुग काढणीला आलेला होता. पावसामुळे मात्र शेंगा तोडता आलेल्या नाहीत. नेहमीप्रमाणे मजुरांचा प्रश्नही कायम राहिला. मूग तोडणीला महिला, मजूर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. कारण इतर पीकांची खुरपणी चालू होती. एकूणच मूगावरील संकट कायम राहिले आणि आता पाऊस थांबला तरी मूगाचे झालेले नुकसान भरून येऊ शकणार नाही.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉगडाऊन झाल्यानंतर सर्व सामान्य जनते बरोबरच शेतकरी बांधवाना मोठा फटका बसला आहे भाजीपाला, दूध, फळे व फुले विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यावर निसर्गाने मात्र चांगली कृपा केली होती. यावर्षी प्रथमच मान्सूनचा पाऊस वेळेवर झाला. गेल्या सहा दिवसांपासून कुठे रिमझिम, कुठे आधिक तर कुठे बारीक भुरभुर चालू आहे. सूर्यदर्शनच न झाल्यामुळे कमी कालावधीत हातात येणारे पीक मूगाचे पीक मात्र अडचणीत आले आहे. सध्या मूग काढणीला आला असून पावसाने उघडीप न दिल्याने बर्याच ठिकाणी मुगाचे पीक संकटात सापडले आहे. घाई-गरबड करून हाती आलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहे.
सेलू तालुक्यात एकूण 58648 हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली असून यापैकी सर्वात जास्त 33112 हेक्टर मध्ये कापूस पीक आहे. 17464 हेक्टर मध्ये सोयाबीन तर 4607 हेक्टर मध्ये तूर व 2832 हेक्टर मध्ये मुगाची पेरणी झालेली आहे. परंतु सोयाबीनचे बोगस बियाणे न उगवल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचा फटका सहन करावा लागला आहे.































































