पोलीस महासंचालक आमचा फोनच घेत नाही! उत्तर प्रदेशातील भाजप आमदार संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-logo

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे. या सत्ताधारी पक्षाचे आमदारच पोलिसांवर सध्या संतापलेले आहेत. पोलिसांसोबत आमदारांचे संघर्षाचे प्रसंग वाढले असून यामुळे चिंतेत पडलेल्या एका आमदाराने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना म्हटलंय की ‘आता आरोपींप्रमाणे आमदारांनाही उत्तर प्रदेश सोडावे लागेल’.

रामचन्द्र कह गये सिया से ,ऐसा भी दिन आएगा ।एक दरोगा mla से तू,तेरे ,तुझको कह कर के,हाथ पैर भी तोड़ेगा।। मा0 मुख्यमंत्री…

Posted by Shyam Prakash on Thursday, August 13, 2020

काही दिवसांपूर्वी इगलास मतदारसंघाचे भाजप आमदार राजकुमार सहयोगी आणि गोडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनुज कुमार यांच्यात बाचाबाची झाली होती. आमदारांनी आरोप केला होता की अनुज कुमार यांनी आपल्याला मारहाण केली होती. राजकुमार सहयोगी यांच्या या आरोपानंतर खासदार सतीश गौतम यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित केलं होतं आणि पोलीस अधीक्षकांची बदली केली होती.

हे प्रकरण ताजं असताना गोरखपूरचे भाजप आमदार आरएमडी अग्रवाल यांनीही उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे. अग्रवाल यांनी लखीमपूर हत्या प्रकरणी पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला असून याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय की 25 जूनला या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. अग्रवाल यांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशाचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी आणि उत्तर प्रदेशाचे पोलीस महासंचालक एचसी अवस्थी यांना फोन केला होता, मात्र दोघांनीही फोन उचलला नाही. अग्रवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वृत्ती कशी असते हे दिसून येतं. जर या अधिकाऱ्यांची असी वृत्ती असेल तर कनिष्ठ अधिकारी कसे वागत असतील याचा विचार करा असं ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी आमचे फोन उचलायलाच हवे असेही त्यांचे म्हणणे आहे. भाजपचे आमदार श्याम प्रकाश देवमणी द्विवेदी यांनीही काही पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. द्विवेदी यांनी पोलिसांकडून आमदारांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाबाबत मंत्र्यांकडेही तक्रार केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनीही पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बागपत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोकर यांच्या हत्याप्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची झालेली हत्या हे स्थानिक पोलिसांचे अपयश असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. या भागात अवैध हत्यारांचा धंदा फोफावला असून पोलिसांनी याविरूद्ध कारवाई करण्याची गरज आहे. बागपतचे पोलीस आमदार मुकेश धामा यांनी खोकर हत्या प्रकरणाबाबत बोलताना म्हटलं आहे की प्रत्येक गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. काही गुन्हेगार असे आहेत ज्यांना पोलिसांचे संरक्षण आहे. या प्रकरणी नवे पथक नेमण्यात आले असून परिस्थिती सुधारेल अशी आसा असल्याचे धामा यांनी म्हटले आहे. धामा यांनी जेलमध्ये असलेल्या सुनील राठी नावाच्या गुन्हेगाराचा उल्लेख करत म्हटले की राठी हा तुरुंगातून सूत्रं हलवत आहे आणि मोबाईल फोन बाळगतोय, आतापर्यंत पोलिसांना त्याचा मोबाईल फोन सापडलेला नाहीये.