
शिरोळ तालुक्याला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीच्या प्रलयंकारी महापुरामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यंदा पुन्हा शिरोळ तालुक्यात महापूराचे संकट निर्माण झाले आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी येथील दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले असून येथील प्रबुद्धनगर मध्ये पुराचे पाणी शिरल्याने सुमारे 10 कुटुंबे समाज मंदिरात स्थलांतरित झाली आहेत. तर एका कुटुंबाने औरवाड फाटा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या एका ट्रकमध्येच संसार थाटला आहे. कुरुंदवाड येथील 44 कुटूंबाना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. महापूराची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे.
तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली असून आपत्ती व्यवस्थापन समितीला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील अतिधोकादायक गावात यांत्रिक बोट व आपत्ती व्यवस्थापन समीतीचे जवान तैनात ठेवण्यात आले आहेत. तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सुमारे तीन फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे पुराचे पाणी नृसिंहवाडीतील नागरी वस्तीमध्ये शिरले आहे. बाबर प्लॉट, रामनगर, सुमित्रा मंगल कार्यालय परिसर, प्रबुद्ध नगर येथील 20 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
प्रबुद्धनगर येथील रामचंद्र कांबळे यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांनी आपला संसार औरवाड फाटा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या एका ट्रकमध्ये थाटला आहे. कोरोनाचे संकट असल्याने संसर्गाचा धाका असल्याने आम्हाला कोणी त्यांच्या घरात ठेवणार नाही. घरात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे आम्हाला हा पर्याय निवडावा लागला, असे कांबळे यांनी सांगितले. घरातील पुराचे पाणी ओसरेपर्यंत येथेच आम्ही आमच्या कुटुंबासमवेत मुक्काम करणार आहोत, असे ते म्हणाले .कुरुंदवाड येथील 44 कुटुंबातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील राजापूर, तेरवाड, शिरोळ हे तिन्ही बंधारे चार दिवसांपूर्वीच पाण्याखाली गेले असून शिरढोण,औरवाड, भैरववाडी, नांदणी रोड, आनवडी हे पूल पाण्याखाली गेल्याने येथील अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.






























































