
>> श्रेणिक नरदे
नीती आयोगाने केंद्र सरकारला ऊस क्षेत्र कमी करावे अशी शिफारस केली आहे. ऊसाऐवजी पर्यायी पीक घेणाऱ्य़ा शेतकऱ्य़ाला ‘भरघोस’ अनुदानाची लालूचही नीती आयोगाने दाखवली आहे. अर्थात आयोगाची ही शिफारस म्हणजे ‘रोगापेक्षा उपाय भयंकर’ अशीच म्हणावी लागेल. देशातील एकूण ऊस शेतीपैकी मोठा हिस्सा महाराष्ट्राचाही आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. उसाभोवती आर्थिक आणि राजकीय हेही विषय सलग जोडले जातात. नीती आयोग ही तज्ञ व्यक्तींची भरणा असलेली संस्था असली तरी कधी कधी ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’ या म्हणीचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.
अलीकडील काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात ऊस लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी या बातम्या आपण वृत्तपत्र आणि टेलिव्हिजनवरून बघतोय. मात्र गेल्या पाचेक वर्षांत ‘ऊस म्हणजे मोठी अडचण आहे’ असं वारंवार भासवलं जात असल्याचं दिसतं.
आता तर नीती आयोगाने केंद्र सरकारला 3 लाख हेक्टरवरील ऊसक्षेत्र कमी करण्याची शिफारस केली आहे. बदल्यात जे शेतकरी उसाखेरीज इतर पिकं घेतील त्यांना हेक्टरी सहा हजारांचं ‘भरघोस’ अनुदान सरकारनं द्यावं अशी शिफारस केली आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्य़ाची जितक्या क्षेत्राची नोंदणी सरकारकडे आहे, त्यापैकी 85 टक्के ऊस घ्यावा. (म्हणजे एक एकर जर उसाची नोंद असेल तर 34 गुंठय़ातील ऊसच कारखाना नेणार). या शिफारसी करण्यामागे अतिरिक्त साखरेचं उत्पादन, क्षारपड जमीन, पिण्याच्या पाण्याची टंचाई आदी कारणे आयोगाने सांगितली आहेत.
नीती आयोगाचे ऊस शेतीवरील आक्षेप यावर आपण चर्चा करू.
सातत्याने ऊस पीक घेतल्याने जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि जमीन क्षारपड होते. या मुद्दय़ाभोवती विचार करताना महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस हा पश्चिम महाराष्ट्रातील नदीपट्टय़ात होतो. अर्थात कोल्हापूर, सांगली जिह्यात. 2019 असो की आताचे संकटग्रस्त वर्ष 2020 असो, या सलग दोन्ही वर्षी अतिवृष्टी झाली. परिणामी कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना पूर, महापूर आला. जिथं जनजीवन विस्कळीत होतं, तिथं शेतातील पिकांची तगून राहण्याची अपेक्षा करणे निरर्थक असते. मात्र यावर एकमात्र उपाय ऊस पीक असेल तर ते काही प्रमाणात तगून राहतं. हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आता या ऊसपट्टय़ात तेलबिया, उदा. सोयाबीनचं पीक घेतलं आणि पूर आला तर काय परिस्थिती होईल ? सोयाबीन हाती लागणार तर नाहीच, मात्र या नदीपट्टय़ात आत्महत्यांचं सत्र सुरू होईल.
काही जमिनी या क्षारपड झाल्या हे जरी सत्य असलं तरी जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी साखर कारखाने मदत करत आहेत. शरद सहकारी साखर कारखाना असेल किंवा दत्त सहकारी साखर कारखाना असेल, या कारखान्यांनी मोठय़ा प्रमाणावर क्षारपड जमिनींची सुधारणा घडवून आणून ती जमीन लागवडीयोग्य केलीय.
ऊस शेतीऐवजी भाजीपाला उत्पादन
आतापर्यंत सिंचनाची सोय उत्तम झालेली आहे. मोठी शेती असणारे लोक ऊसच करतात. मात्र अल्पभूधारक शेतकरी हे त्याच वेळी भाजीपाला करतात. तरीही आपण एकाच वेळी मोठी आवक होऊन रस्त्यावर भाजीपाला फेकून देणारा हतबल शेतकरी पाहत आलेलो आहोत. उद्या हेच सारे मोठे शेतकरी जर भाजीपाल्याकडे वळले तर अल्पभूधारक शेतकरी औषधालाही शिल्लक राहणार नाही. भाजीपाल्याची आवक इतकी होईल की, अल्पभूधारक शेतकरी पूर्णतः भुईसपाट होईल.
ऊस शेतीला पाणी हे अतिरिक्त लागतं आणि त्यातून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते असा एक आक्षेप वारंवार घेतला जातो.
गेल्या काही वर्षांत ऊस लागणीच्या पद्धतीत मोठा बदल झालेला आहे. रोपवाटिकेतून दोन महिना वाढ झालेली रोपं शेतकरी आणतो, पूर्वी अडीच-तीन फुटी सऱ्य़ा सोडल्या जायच्या, त्या आज पाच फुटांपर्यंत लांब होत गेलेल्या आहेत. हे दोन महिन्यांचं उसाचं रोपटं साधारण दोन फुटांवर लावलं जातं आणि पाटपाण्याच्या ऐवजी ड्रिपने पाणी सोडलं जातं. पाणी आणि खते सोडणं सोयिस्कर व्हावं यासाठी अधिकाधिक शेतकरी या ठिबक सिंचनाकडे वळतोय. जादा पाणी सोडलं की, जादा उत्पादन येतं या गैरसमजातून शेतकरी बाहेर पडला असून मोजकं पाणी, योग्य ती खतं, जिवाणूंची आळवणी अशा आधुनिक पद्धतीने ऊस शेती होत आहे आणि पूर्वीपेक्षा पाण्याची बचत शेतकरी करतोय हे जेव्हा आपण बांधावर जाल तेव्हा आपल्याला दिसून येईलच. या पलीकडे जाऊन अनेक जलतज्ञांची जी चिंता आहे ती म्हणजे दुष्काळी भागातही ऊस पीक घेतलं जातं. का घेऊ नये? उसाएवढं उत्पन्न देणारा पर्याय द्या. कशाला शेतकरी ऊस करेल? मात्र पर्याय देण्याऐवजी तुच्छ उपदेश देण्यात, सरकारला शिफारसी देण्यात जलतज्ञ धन्यता मानत असतात.
मजूर टंचाई
ग्रामीण भागात शेतावर मजुरी करण्यासाठी येणारी पिढी आता संपलेली आहे. आता शेतावर मजुरी करण्यासाठी येणारा तरुण वर्ग नाही. जे लोक आज शेतमजूर आहेत त्यांचं सरासरी वय 40 च्या पुढचंच आहे. उसाला लावणी, खुरपणीव्यतिरिक्त मजुरांची गरज भासत नाही. त्याउलट भाजीपाला शेतीसाठी सातत्याने मजूर लागतो तर हे मजूर आणायचे कुठून? पाश्चात्त्य देशांत पूर्णतः यांत्रिकीकरण झाल्याने तिथे मजुरांची गरज कमी भासते. मात्र हिंदुस्थानसारख्या देशात शेतीत मनुष्यबळ लागतंच. तर हे मजूर कुठून आणायचे ?
खाद्यतेल आणि डाळी आपण मोठय़ा प्रमाणावर आयात करतो. तेच उत्पादन हा शेतकरी करू शकतो. मात्र अडचण अशी आहे की, त्यातून उसाएवढं आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तो पर्याय निवडत नाही. डाळी आणि तेलबिया यातूनही मोठय़ा प्रमाणावर नफा मिळू शकतो तो जी.एम. बियाण्यांचा वापर करून. मात्र तिथंही मोठा विरोध होतो. परदेशी तंत्रज्ञान, देशी धान्य अशा कालबाह्य संकल्पना कुरवाळून त्यांना विरोध होत असतो. मात्र ज्या डाळी येतात त्या जीएम, जे तेल येतं तेही जीएम. मात्र आपल्या देशात जीएम पिकं होऊ द्यायची नाहीत, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्य़ाला द्यायचं नाही. एवढंच काय, आपल्या देशातील संशोधकांनी तयार केलेलं जीएम मोहरीच्या वाणालाही आपलं सरकार परवानगी नाकारत असतं. हे विषयांतर एवढय़ाचसाठी की, शेतकरी का तेलबिया, डाळींकडे वळत नाही? याची कारणे ही आर्थिक आहेत. जोवर उसाइतकं आर्थिक उत्पन्न देणाऱ्य़ा पिकाचा पर्याय शेतकऱ्य़ांना मिळत नाही तोवर ऊस शेती ही सातत्याने वाढतच राहणार.
एखाद्या गोष्टीचं भरपूर उत्पादन आपल्या देशात होतं ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असते. मात्र आपले लोक इतके विचित्र आहेत की, त्यांना ही समस्या वाटते. साखर निर्यातीचं धोरण सातत्याने फसत आलंय. त्याहूनही मोठी समस्या अशी की, देशांतर्गत साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजाराहून वाढवून ठेवायचे. त्यामुळे साखर कारखानदार निर्यातीचं धाडसच करत नाही. परिणामी ही साखर गोदामात पडून राहते. साखर गोदामात पडते तेव्हा एक्सपायरी डेटकडे वाटचाल करता करता त्यावरील विमा आणि इतर खर्चातही पाडत असते. हा खर्च वाढवून किंमत कधीही मिळत नाही. मग कारखानदारी तोटय़ात जाते. दरवर्षी हजारो कोटींचं पॅकेज केंद्राला द्यावं लागतं आणि हीच ती समस्या नीती आयोगाला भेडसावते. मग त्यातून उत्तर शोधण्याऐवजी तो प्रश्नच संपवण्याकडे अशा शिफारसीतून वाटचाल सुरू होते, जी कोणाच्याही फायद्याची नाही.


























































