
गुगल पेकडून पैसे परत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने एका महिलेला 1 लाख 22 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी पुण्यातील खराडीत राहणाऱ्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला 10 ऑगस्टला एकाचा फोन आला. त्याने महिलेला गुगल पेकडून बोलत असल्याचे सांगितले आणि महिलेचा विश्वास संपादन केला. बँक खात्यातून डेबिट झालेले पैसे तुम्हाला पैसे परत दिले जाणार आहेत, असे त्याने सांगितले. महिला गुगल पे वापरत असल्यामुळे त्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने सांगितल्याप्रमाणे महिलेने टीम व्ह्यूव्हर क्वीक सपोर्ट अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची डिटेल्स चोरुन 1 लाख 22 हजार रूपये स्वतः बँक खात्यावर वळविले. महिलेला बँकखात्यामधून पैसे कमी झाल्याच्या मेसेज आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

























































