
बीड जिल्ह्यातील पाच शहरात रॅपिड अॅन्टिजेन टेस्टमध्ये 248 व्यापारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा आरटीपीसीआरचा अहवाल आला. त्यात 60 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. बीड जिल्ह्यातील पाच शहरामध्ये सलग तीन दिवस रॅपिड अॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात अनेक व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. गुरुवारी शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत अॅन्टिजेन तपासणी सुरू होती. दिवसभरात 248 व्यापारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर रात्री उशिरा दिवसभरात आरटीपीसीआरच्या 663 जणांच्या तपासण्या झाल्या होत्या. यामध्ये 603 जण निगेटिव्ह आले तर 60 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 16, बीड 16, धारूर 4, गेवराई 10, केज 4, माजलगाव 3, परळी 2, शिरूर 4, वडवणी 1 असे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच शुक्रवारी 112 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3549 झाली आहे. सध्या 1604 रूग्णांवर उपचार सुरू असून 1867 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 78 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.






























































