
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स( बीएसएफ) ने हिंदुस्थान-पाकिस्तान हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाच पाकिस्तानींना ठार केले आहे. हे घुसखोर पंजाबमधील तरनतारन येथे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी बीएसएफच्या जवानांनी त्यांना ठार केले. हे घुसखोर आतंकवादी होते की तस्कर याबाबत बीएसएफ तपास करत आहेत.
याबाबत माहिती देताना बीएसएफने सांगितलं की, 103 बटालियनच्या सैनिकांनी तरनतारनच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरांना पाहिले. बीएसएफच्या जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र या घुसखोरांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. याच्या प्रत्युत्तरात करण्यात आलेल्या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले आहेत. या घसखोरांकडून बीएसएफ जवानांनी एके-47, एक पिस्तूल आणि बॅग ताब्यात घेतली आहे. बीएसएफ याबाबत पुढील तपास करत आहेत.





























































