
नॅशनल ऍण्टी डोपिंग एजन्सीकडून (नाडा) आयपीएलसाठीच्या डोप टेस्ट प्रोगामचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्य़ा या स्पर्धेत नाडाकडून 50 खेळाडूंची डोप टेस्ट घेण्यात येणार आहे. यामध्ये महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली व रोहित शर्मा या स्टार खेळाडूंचा समावेश असण्याची दाट शक्यता यावेळी नाडाच्या डोप कंट्रोल पदाधिकाऱ्य़ाकडून व्यक्त करण्यात आली अशी माहिती एका इंग्रजी दैनिकामधून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
खेळाडूंच्या डोपिंग चाचणीसाठी नाडाकडून तीन गटांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गटामध्ये पाच व्यक्तींचा समावेश असणार आहे. यामध्ये नाडाचा एक वरिष्ठ अधिकारी, दोन डोप कंट्रोल पदाधिकारी व यूएईतील ऍण्टी डोपिंग संस्थेतील दोन स्थानिक व्यक्ती यांचा समावेश असणार आहे. या तीन गटांतील पहिली बॅच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात यूएईला रवाना होईल. यूएईला रवाना होण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्य़ाना कोरोना चाचणीला सामोरे जावे लागेल. तसेच यूएईला पोहोचल्यानंतरही त्यांची कोरोना चाचणी होईल.
पाच सेंटरद्वारे काम चालणार
नाडाकडून खेळाडूंच्या चाचणीसाठी एक योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार यूएईमध्ये पाच सेंटरद्वारे हे काम चालणार आहे. दुबई, अबुधाबी व शारजाह या ठिकाणी आयपीएलचे सामने होणार असून दुबईतील आयसीसी ऍकॅडमी व अबुधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियम येथे हे खेळाडू सराव करणार आहेत. या पाचही ठिकाणी नाडाचे सेंटर असणार आहे. या प्रत्येक ठिकाणी नाडाचा प्रत्येकी एक डोप कंट्रोल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच यावेळी नाडाकडून खेळाडूंच्या युरिन सॅम्पलसोबतच रक्ताचेही नमुने घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खेळण्याच्या ठिकाणीच टेस्ट होणार
नाडाचे डायरेक्टर जनरल नवीन अग्रवाल यावेळी म्हणाले की, खेळाडूंची चाचणी ही ज्या ठिकाणी लढती होतील, त्याच ठिकाणी डोप कंट्रोल अधिकाऱ्य़ाकडून करण्यात येईल. तसेच स्पर्धेच्या लढती होत नसलेल्या म्हणजेच हॉटेलसह इतर ठिकाणी खेळाडूंची चाचणी करण्यात येणार नाही.खेळाडूंच्या डोपिंग चाचणीसाठी नाडाकडून तीन गटांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गटामध्ये पाच व्यक्तींचा समावेश असणार आहे.



























































