JEE व NEET च्या परिक्षा पुढे ढकला, सोनू सूदची केंद्र सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

JEE(Main) परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. NEET (UG) च्या परीक्षेची तारीख 3 सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाचा फैलाव अजून थांबलेला नसताना परीक्षा कशी द्यायची या विवंचनेत सगळे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांकडून परिक्षा पुढे ढकलाव्यात किंवा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. आता प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने देखील या परिक्षा पुढे ढकलाव्या अशी मागणी केली आहे.

सोनू सूदने ट्विटरवरून केंद्र सरकारकडे या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ‘मी केंद्र सरकारला विनंती करतो की सध्या देशात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहता NEET व JEE च्या परिक्षा पुढे ढकलाव्या. या अशा परिस्थितीत आपण विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे’, असे ट्विट त्याने केले आहे. त्यांनी याबाबत आणखी एक ट्विट करत बिहारमधील पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी परिक्षेला मुकतील असेही दुसऱ्या ट्विट मध्ये सांगितले आहे. ‘बिहार, आसाम, गुजरात सारख्या राज्यात पूर आला आहे. बिहारमधील अनेक गावात विद्यार्थी अडकले आहेत. संपूर्ण जग निसर्गापुढे थांबलं आहे. त्यामुळे काही काळासाठी परिक्षा थांबवल्या आहे.’, असे देखील ट्विट त्यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही याच मुद्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत ही परीक्षा पुढे ढकला अशी मागणी केली होती. परीक्षा पुढे ढकलली नाही तर कोरोना महामारीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची महामारी पसरेल असा इशारा त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे. नोव्हेंबरपर्यंत देशातील परिस्थिती सुधारेल अशी आशा असल्याने दिवाळीनंतर या परीक्षा घ्याव्यात अशी विनंतीही स्वामी यांनी केली आहे.