
आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि बीसीसीआयला आयपीएल खेळवण्याची संधी मिळाली. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. कोरोनामुळे बाजारात मंदी आलीय. त्यामुळे टायटल स्पॉन्सरशिपद्वारे बीसीसीआयला ड्रीम इलेव्हनकडून फक्त 222 कोटी रुपये मिळालेत. याआधीच्या विवो या स्पॉन्सरकडून बीसीसीआयला वर्षाला 440 कोटी रुपये मिळत होते. आता या स्पर्धेच्या लढती प्रक्षेपित करणारी स्टार वाहिनी यांनीही आयपीएलमधून 3500 कोटींच्या वर कमाई करण्याची योजना आखली आहे. मात्र कोरोनाच्या काळात जाहिरातींच्या माध्यमातून त्यांना कोटय़वधींची कमाई करता येते की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे.
विविध ब्रॅण्डशी बोलणी सुरू
आयपीएलच्या लढती यंदा बंद स्टेडियममध्ये होणार आहेत. प्रेक्षकांच्या स्टेडियममधील उपस्थितीसाठी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा वेळी कोणतीही कंपनी आयपीएलमध्ये गुंतवणूक करील की नाही याबाबत शंका आहे. तरीही स्टार इंडियाने ऍमेझॉन, ड्रीम इलेव्हन, फोन पे या कंपन्यांसह ऑटो, गेमिंग, एज्युकेशन, कन्झुमर डय़ुरेबल, एफएमसीजी व ई-कॉमर्स आदींशी निगडित असलेल्या ब्रॅण्डशी जाहिरातींबाबत चर्चा करायला सुरुवात केली आहे.
हिंदुस्थानी संघाच्या पोशाख किटसाठी अदिदास, प्युमाचे प्रयत्न
हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या पोशाख किटसाठी अदिदास व प्युमा या दोन क्रीडा क्षेत्रातील प्रमुख कंपन्या उत्सुक असल्याची माहिती मीडियामधून समोर येत आहे. बीसीसीआयकडून हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या पोशाख किटसाठी शनिवारी लिलाव मागणी करण्यात येणार आहे. अदिदास व प्युमा या कंपन्या बीसीसीआयसोबत हातमिळवणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची बातमी सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.




























































