लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीने भागवली भूक; रत्नागिरी जिल्ह्यात साडेतीन लाख थाळ्यांचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना शिवभोजन थाळीचा आधार मिळाला. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने अनेकांच्या पोटची भूक भागवण्याचे काम शिवभोजन थाळीने केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आली असून आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलेला शब्द पाळत राज्यात 10 रुपयांत शिवभोजन थाळी सुरु केली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरुवातीला तीन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आली होती. 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी मिळू लागल्यामुळे अनेक गोरगरीबांचे उदरभरण झाले.‍ अतिशय चांगल्या दर्जाचे भोजन मिळू लागल्यामुळे शिवभोजन थाळीला प्रतिसाद मिळू लागला. हळूहळू केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यानंतर अनेक मजूरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली. त्याचवेळी राज्य सरकारने शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये 20 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आली. कोरोनाच्या संकटातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शिवभोजन थाळी गरीबांची भूक भागवत आहे. 1 एप्रिलपासून 10 रुपयांऐवजी 5 रुपयांत शिवभोजन थाळी मिळू लागली. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 50 हजार थाळ्यांचे वाटप झाल्याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. भात, चपाती, वरण, भाजी अशा प्रकारचा हा पाच रुपयांत मिळणारा आहार सर्वसामान्य आणि गोरगरीबांसाठी एक आधार बनला आहे.