
मालवण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी करण्यात आलेल्या स्वॅब तपासणीत 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 108 रुग्णवाहिका चालकाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्या चालकाच्या कुटुंबातील काही सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 3 तसेच ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयात शनिवारी 77 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात शहरातील मशीद गल्ली येथील 3, आचरा येथील 8, कोळंब येथील 1, कुंभारमाठ येथील 3, परुळे येथील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयात संपर्क करून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच जंतुनाशक फवारणीही प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी केली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येने मालवणात चिंतेचे वातावरण आहे.



























































