
कोरोना सारख्या महामारीच्या काळात जेईई आणि नीट परीक्षा घेऊ नयेत, त्या पुढे ढकलाव्यात, अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे. या मागणीसाठी विविध राज्यातील विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले असतानाच हिंदुस्थानातील दोन विद्यार्थ्यानी याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे दार ठोठावले आहे. या दोन विद्यार्थ्यांनी त्यांना पत्र लिहत, या पात्रता परीक्षा पुढे ढकलून यात वेळीच हस्तक्षेप घालण्याची मागणी केली आहे. आता सरन्यायाधीश बोबडे याप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
विधी शाखेतील तिसऱया वर्षात शिकणाऱया एका विद्यार्थ्याने आणि बारावीतील एका विद्यार्थ्याने मिळून बोबडे यांना हे पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारचा जेईई आणि नीट परीक्षा घेण्याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात या विद्यार्थ्यांनी बोबडे यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारचा जेईई आणि नीट परीक्षा घेण्याचा निर्णय म्हणजे संविधानाच्या कलम 21चे उल्लंघन करणारा असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालण्यासारखे आहे. ज्यांनी या परीक्षांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याची भिती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनासारख्या महाभंयकर महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे. जगभरातील लाखोंना त्याचा फटका बसला आहे. जे यातून वाचले आहेत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार असल्याचे सांगण्यात येते, असे असताना परीक्षेचा निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणे कितपत योग्य
कोरोनापासून लोकांची सुटका व्हावी यासाठी न्यायालये, संसद आणि अनेक राज्यांचे विधान मंडळ बंद आहेत. अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयात फक्त 50 टक्केच उपस्थिती आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना राबकिण्यात येत आहेत, या सगळ्यांचे स्वागतच आहे. पण अशावेळी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणे कितपत योग्य आहे. एकीकडे अती महत्वांच्या व्यक्तींचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली जात आहे. तर दुसरीकडे 17 – 18 वर्षीय मुलांना पात्रता परीक्षांसाठी त्यांचे जीव धोक्यात घालण्यास सांगणे कितपत योग्य असल्याचे त्यांनी या पत्रात अधोरेखित केले आहे.




























































