
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीला आलेला महापूर काही अंशी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यत: वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणातून झालेला 31000 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग आता 5 हजार क्युसेक्सपर्यंत घटविण्यात आला आहे. परिणामी खालच्या भागात पाणी पातळी दोन ते तीन फुटांपर्यंत ओसरली आहे.
ब्रह्मपुरी शहरात पाण्याचा झालेला शिरकाव बऱ्यापैकी ओसरला असून या भागातील जनजीवन सुरळीत होण्यास यामुळे मदत मिळणार आहे. मात्र पुरात प्रत्यक्ष अडकलेल्या लाडज- बेलगाव- बेटाळा- पिंपळगाव-मांगली येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची प्राथमिकता प्रशासनाने ठरवली आहे. सध्या एन डी आर एफ, एस डी आर एफ, जिल्हा प्रशासन यासह 60 जवानांच्या सैन्यदल तुकडीच्या मदतीने हे बचाव कार्य वेगवान केले जाणार आहे. आगामी काळात मध्य प्रदेशातल्या संजय सरोवरातून झालेला विसर्ग गोसीखुर्द धरणात येण्याची शक्यता असल्याने त्याआधी पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे प्रशासनाची प्राथमिकता राहणार आहे.

























































