जालन्यात गणपती विसर्जनादरम्यान दोघे बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोघेजण गणेश विसर्जनासाठी, तर दोघे पोहायला गेले असताना ही घडली. चौघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

शहरातील कादराबाद येथील सिद्धार्थ रवींद्र वाघमारे (18) आणि सौरभ देवेंद्र जयस्वाल (17) हे दोघे एका अन्य मित्रासोबत रोहनवाडी परिसरात असलेल्या शेततळ्यात गणपती विसर्जनासाठी गेले होते. तिघेही तलावात उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तिसऱ्याला पोहता येत असल्याने तो काठावर आला आणि आरडाओरड करून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केले. मात्र, त्याला अपयश आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दुसऱ्या प्रकरणात बदनापूर तालुक्यातील अनवी या गावचा 35 वर्षीय तरुण कैलास हरी राठोड हा शेतामध्ये फवारणी करून जवळच असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तिसऱ्या प्रकरणात जालना तालुक्यातीलच सिंधी काळेगाव येथील समीर शेरखान पठाण (18) खदानीमध्ये पोहण्यासाठी गेला
होता. त्याचाही बुडून मृत्यू झाला आहे.