
शहरातील विविध भागात गुन्हे करणाऱ्या सराईताला कोथरूड पोलिसांनी वेषांतर करुन पकडले आहे. मागील 10 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या नावाने राहत होता. अखेर कोथरूड पोलिसांनी कासुर्डी गावात वेषातंर करुन सराईताला बेड्या घातल्या आहेत. प्रवीण दत्तात्रय पायगुडे (वय 31, रा. कासुर्डी, ता. भोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरी, जबरीचोरी, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्ष 2010 मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिस शोध घेत असताना तो गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. कोथरूड पोलिसांना प्रवीण कासुर्डी गावात दाद्या टोपण नावाने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी अजय सावंत व विजय कांबळे यांनी त्या गावात वेषांतर करुन काही दिवस घालविले. त्यानंतर तो सराईत प्रवीण असल्याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, युवराज काळे, श्रीकांत माने, नितीन कानवडे यांच्या पथकाने केली.





























































