उपनगरातील सात लाख वीज ग्राहकांच्या घरी बसणार स्मार्ट मीटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरातील सात लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसणार आहेत. मीटर रीडिंगची कटकट कमी करण्यासाठी वीज नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीला पहिल्या टप्प्यात उपनगरातील वीज सात लाख ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसकण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी टेंडर मागवले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे 50 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सध्या सर्वसाधारण डिजिटल वीज मीटर आहेत. मात्र लॉकडाऊन काळात ग्राहकांच्या घरोघर जाऊन मीटर रीडिंग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्वच वीज कंपन्यांनी लॉकडाऊन काळातील वीज बिले सरासरी वीज वापराच्या आधारे देण्याचे निर्देश वीज आयोगाने दिले होते. मात्र मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अवाचेसवा बिले आल्याच्या तक्रारी ग्राहक करत होते. त्याची दखल घेत पहिल्या टप्प्यात उपनगरात सात लाख स्मार्ट मीटर म्हणजे स्वयंचलीत मीटर रीडिंग करणारे मीटर बसवण्याचे निर्देश आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीला दिले होते. त्यानुसार कंपनीने पहिल्या टप्प्यात सात लाख मीटरच्या खरेदीसाठी टेंडर मागवले आहे. स्मार्ट मीटर उत्पादक कंपन्यांना 14 सप्टेंबरपर्यंत टेंडर भरता येणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजचोरीला पुरता आळा बसणार असून ग्राहकांनाही त्यांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिल मिळणार आहे.