पोलीसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस हे महत्त्वाचे अंग आहेत. लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपीला पुराव्यानिशी न्यायालयासमोर हजर करणे, इत्यादि जबाबदारी पोलिसांवर असते. समाजात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही अधिकार असतात. सर्वसाधारपणे पोलिसांना आपण त्यांच्या खाकी गणवेशावरुन ओळखतो. खाकी गणवेश ही पोलिसांची प्रमुख ओळख आहे. फरक इतकाच की काही राज्यात तो गणवेश किंचित फिकट तर काही राज्यात गडद खाकी रंगाचा असतो.

हिंदुस्थानात इंग्रजांच्या राजवटीत पोलिसांचा गणवेश पांढऱ्या रंगाचा होता. परंतु दीर्घकाळ ड्युटी असल्यामुळे तो गणवेश लवकर मळत असे. या कारणाने त्रस्त होऊन पोलिसांनी आपल्या गणवेशाला वेगवेगळ्या रंगात वापरायला सुरुवात केली. परंतु यामुळे पोलीस वेगवेगळ्या गणवेशात दिसायला लागले. शेवटी वैतागून पोलिसांनी खाकी रंगाची डाय तयार केली. त्यासाठी चहाच्या पानांचे पाणी किंवा कॉटन फॅब्रिकचा रंग डाई म्हणून वापरला. ज्यामुळे त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी झाला.

खाक या शब्दाचा हिंदी अर्थ गाढ मातीचा रंग असा आहे. या खाकी रंगामुळे पोलिसांच्या वर्दीवर धूळ, डाग कमी दिसतील. सर हॅरी लुम्सडन यांनी 1847 मध्ये सर्वप्रथम खाकी रंगाचा गणवेश अधिकृत म्हणून स्वीकारला आणि तेव्हापासून खाकी रंगाचा गणवेश हिंदुस्थानी पोलिसात कार्यरत आहे. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना ऋषी भूमकर यांनी ही माहिती दिली.