25 वर्षांनी तरुण महिलेशी लग्न केलं, 2 महिन्यांनी डोळे उघडताच आजोबांना धक्काच बसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

66 वर्षांचे आजोबा जुगल किशोर यांच्या बायकोचं वर्षभरापूर्वी निधन झालं होतं. व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या जुगल यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहात नाही. बायकोच्या निधनानंतर त्यांना एकटेपणा जाणवायला लागला. हा एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं होतं. या वयात कोण लग्न करणार असा प्रश्न जुगल यांना पडला होता. मात्र त्यांनी विवाहजुळवणी संस्थेमार्फत आपले प्रयत्न सुरू केले होते. खन्ना विवाह केंद्रातून एकेदिवशी त्यांना फोन आला आणि जुगल यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

खन्ना विवाह संस्थेने जुगल यांना सांगितले की त्यांच्याकडे एक चांगलं स्थळ आहे. मोनिका असं तरुणीचे नाव असून ती त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. जुगल यांनी तातडीने मोनिकाचे घर गाठले आणि तिच्या आईची आणि भावाची भेट घेतली. या दोघांनी आणि मोनिकाने जुगल यांना सांगितले की मोनिकाचं लग्न झालं होतं, मात्र तिचा आणि नवऱ्याचा घटस्फोट झाल्यानंतर ती एकटीच राहाते आहे. जुगल यांना बघून मोनिका म्हणाली की ते तिला खूप सभ्य व्यक्ती वाटत असून ती लग्न करण्यास तयार आहे.

ऑगस्ट महिन्यात जुगल आणि मोनिका यांनी लग्न केलं. दोघं एकत्र राहात होते. लग्नानंतर जुगल यांचे दोन महिने आनंदात गेले. त्यानंतर एके दिवशी ते जेव्हा उठले तेव्हा त्यांना दिसलं की मोनिका गायब झाली आहे. घरातल्या किंमती वस्तू , रोकड आणि दागिनेही गायब आहेत. जुगल यांनी सीसीटीव्ही दृश्ये तपासली तेव्हा त्यांना दिसलं की मोनिकाने घरातल्या सगळ्या मौल्यवान गोष्टी चोरल्या आणि ती पळून गेली. घाबरलेल्या जुगल यांनी खन्ना विवाह संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी जुगल यांना धमकावले आणि गप्प राहण्यास सांगितले. त्यांनी आपल्याकडे 20 लाख रुपये देखील मागितल्याचे जुगल यांनी म्हटलं आहे.

जुगल यांनी मोनिकाची माहिती गोळा करायला सुरुवात केली असता त्यांना कळालं की तिच्या आधीच्या नवऱ्यालाही तिने अशाच प्रकारे गंडवलं होतं. जुगल यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना कळालं की मोनिकाने जुगल यांच्यासह एकूण 8 वृद्धांना गंडा घातलेला आहे. मोनिका ही फक्त वरिष्ठ नागरिकांनाच हेरायची आणि त्यांच्याकडचा सगळा ऐवज घेऊन पळून जायची. मोनिकाने अशा वृद्ध व्यक्ती निवडल्या होत्या ज्या सरकारी अधिकारी असतील किंवा व्यापारी असतील. तिने एका निवृत्त न्यायाधीशासोबतही लग्न केल्याचे पोलिसांना कळाले आहे. मोनिका अद्याप पोलिसांना सापडली नाहीये, पोलीस तिचा शोध घेत आहेत.