
पालिकेच्या शीव रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने दुसऱ्य़ांदा कोरोनाला हरवण्याची कामगिरी केली आहे. मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. संबंधित डॉक्टरला दोन महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. यावेळी त्यांनी आवश्यक उपचार, खबरदारी घेतल्याने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आताही त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णावर करण्यात आलेले उपचार, त्यांची रोगप्रतिकार शक्ती यामुळे रुग्ण बरे होतात. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याने त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होत नाही असे बोलले जात होते. मात्र ज्या चीनच्या हुवांग प्रांतात कोरोनाचा उगम झाला त्याठिकाणी पुन्हा कोरोना झालेले रुग्ण समोर आले आहेत. मुंबईतही असाच प्रकार समोर आला आहे. मात्र या डॉक्टरांनी दुसऱ्य़ांदा कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनाचा मार्चपासून प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आदी कर्मचारी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह येत होते. मात्र पालिकेच्या माध्यमातून आवश्यक उपचार आणि खबरदारी घेतल्याने संबंधित कोविड योद्धा कोरोनामुक्त होत आहेत. दरम्यान, सेव्हन हिल रुग्णालयात दुसऱ्य़ांदा कोरोना झालेले तीन रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.




























































