कळंब- दोन गटात झालेल्या हाणामारीत देवधानोरा येथील दोघांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारधी समाजाच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. दरम्यान या हाणामारीत मृत्युमुखी पडलेल्या मृताचा मुलगा, पत्नी व अन्य एक असे तिघांना गंभीर मार लागल्याने धाराशीव येथील शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिरढोण येथील पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करून तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीवरून, मागील भांडणाची कुरापत काढून मंगरूळ शिवारातील पारधी वस्तीवरील मोठा जमाव देवधानोरा शिवारात दाखल झाला. शेती व जुन्या भांडणाची कुरापत काढत या जमावाने देवधानोरा येथील पारधी समाजातील लोकांना मारहाण करण्यास सुरवात केली. हातात काठय़ा, कुऱ्हाडी व दगडाने मारहाण करण्यात आली. यात संतोष शिवाजी पवार (18) व शिवाजी बिचवा पवार (45) यांचा जागीच मृत्य झाला. त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व अन्य एक असे तिघा जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना धाराशीव येथील शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, येरमाळा, शिरढोण येथील सहायक पोलिस निरीक्षकांनी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करत तीन जणांना अटक केली. मृत दोघांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. दवाखान्यात मोठा जमाव जमला होता. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवत आज अकरा वाजता शवविच्छेदन करून प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल झाला असुन या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.