हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात बदल होणार, पश्चिम ऑस्ट्रेलियन सरकारकडून क्वारंटाइन नियमाबद्दल अट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा संघ आयपीएल आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियन दौऱयावर जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांमधील महत्त्वाच्या मालिकेमध्ये बदल करण्यात येणार आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियन सरकारने क्वारंटाइन नियमासाठी कडक धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी संघाला या मालिकेची सुरुवात पर्थऐवजी ऍडलेड किंवा ब्रिस्बेन यापैकी एका ठिकाणाहून करावी लागणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून नव्या वेळापत्रकाबद्दल या आठवडय़ात घोषणा करण्यात येणार आहे.

आम्ही रिस्क घेणार नाही – मार्क मॅकगोवन

हिंदुस्थानी संघ यूएईमधून ऑस्ट्रेलियात येणार आहे. सध्या यूएईमध्ये कोरोनाची दुसरी लाट येत आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थानी खेळाडूंना क्वारंटाइनच्या बाहेर सराव करण्याची मुभा आमच्याकडून देण्यात येणार नाही. ही रिस्क आमच्याकडून घेण्यात येणार नाही असे स्पष्ट मत पश्चिम ऑस्ट्रेलियन सरकारचे मार्क मॅकगोवन यांनी यावेळी व्यक्त केले.

…तर ऍडलेडमध्ये दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार

मेलबर्न शहरामधील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास येथील बॉक्सिंग डे कालावधीत होणारा सामना अन्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे. त्यामुळे ऍडलेड ओव्हलवर दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात येण्याची शक्यताही यावेळी निर्माण झाली आहे. असे झाल्यास डे नाईट कसोटीसह बॉक्सिंग डे कसोटीही तेथे खेळवण्यात येईल.