
लग्नास नकार दिल्यानंतरही तरुणीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवून, पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस शिपायाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. शुभम गजानन मोहिते असे पोलीस शिपायाचे नाव आहे.
मोहिते हा मोटार परिवहन विभागात नेमणुकीला असताना त्याने एका तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याला नकार दिला होता. त्यानंतर शुभमने तिला तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुला ठार करेल अशी धमकी दिली. त्यानंतर 2017 मध्ये त्याने तरुणीला जबरदस्तीने फिरायला नेऊन शारिरीक संबंध ठेवले.
त्यामुळे तरुणीने शुभमला लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, त्याने टाळाटाळ करीत तक्रार दिली तर तरुणीच्या वडिलांसह बहिणीची सरकारी नोकरी घालवितो, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोहितेला निलंबीत करण्यात आले होते. विभागीय चाैकशीत त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने शिपाई शुभम मोहितेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.



























































