
राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असून महिला सुरक्षेच्या विषयात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्येमहिला सुरक्षेचे एसओपी तयार करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
पनवेल, मालाड, मिरा भाईंदरमधील क्वारंटाईन सेंटर, पुण्यातील सह्याद्री हाँस्पिटल अशा राज्याच्या वेगवेगळ्या भागात महिला रुग्णांवर झालेल्या अत्याचारांचा उल्लेख या पत्रात केला आहे. पूर्वी झालेल्या काही घटनांचा तपशीलही यामध्ये नमूद केला आहे. कोणताही घटना झाली तर केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावरही कारवाई करावी अशी मागणी या पत्रात केली आहे.
त्याशिवाय राज्याच्या इतर भागात झालेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची माहिती या पत्रात दिली आहे. या सर्व घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.



























































