20 जवानांच्या हौतात्म्यानंतर चौथ्याच दिवशी चीनकडून घेतले साडेपाच हजार कोटींचे कर्ज! केंद्र सरकारचा धक्कादायक निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाख सीमेवर गलवान खोऱ्य़ात चीनबरोबर झालेल्या हिंसक संघर्षात हिंदुस्थानी लष्कराचे 20 जवान शहीद झाले.जवानांच्या हौतात्म्यानंतर अवघ्या देशात चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली.मात्र या घटनेनंतर चौथ्या दिवशी केंद्र सरकारने चीनकडूनच 5514 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. ही धक्कादायक माहिती सरकारने संसदेत सांगितली आहे.

चीनचे नियंत्रण असलेल्या एशियन इफ्रास्ट्रुक्चर इन्व्हेस्ट बँकेकडून (एआयआयबी)हिंदुस्थानने दोन टप्प्यात मे आणि जून महिन्यात नऊ हजार कोटींवर कर्ज घेतले आहे. या बँकेवर चीनचे वर्चस्व असून मुख्यालय बिजिंग येथे आहे.लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिले. त्यात ही माहिती उघडकीस आली आहे.

आपल्या लष्करासोबत आहात की चिनी ?- राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर चीनस्थित बँकेकडून मोठे कर्ज घेतले. मंगळवारी लोकसभेत संरक्षण मंत्र्यांनी चीनने आपली जमीन बळकावली असल्याचे  सांगितले.  आज केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणतात घुसखोरी झालीच नाही. ही क्रोनॉलॉजी समजून घ्या.  मोदी सरकार हिंदुस्थानी लष्करासोबत आहे की चिनी, असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे.

हेच का सरकारचे सडेतोड उत्तर–ओवेसी

चीनने हिंदुस्थानातील 1600 हुन अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. हेच का सरकारने चीनला दिलेले सडेतोड उत्तर, असा हल्ला एमआयएमचे ओवेसी यांनी केला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी कर्ज कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी 8 मे रोजी सुमारे 3676 कोटी रुपये कर्ज चीनकडून सरकारने घेतले. 15 जूनला गलवान खोऱ्य़ात हिंसक संघर्षात  हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले.यानंतर चार दिवसांनी केंद्र सरकारने  सुमारे 5514 हजार कोटी रुपयांचे कर्ज चीनकडून घेतले.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी हे कर्ज घेण्यात आले.