
लॉकडाऊनच्या काळात फारसं काही वेगळं जगलो नाही. फक्त माझ्या सांगितिक सहकाऱयांना प्रत्यक्ष भेटता आले नाही इतकेच!
संगीतकाराचं जीवन लॉकडाऊनसारखंच असतं. फक्त एरव्ही जे मित्रांना भेटणं असतं ते यावेळी नव्हतं. कुठेही बाहेर गेलो नाही. लॉकडाऊनमध्ये फार काही नावीन्यपूर्ण काम करता आलं नाही. फक्त संगीताशी संबंधित नवीन काही तांत्रिक गोष्टी म्हणजे सॉफ्टवेअर, प्रोगॅमिंग शिकलो. त्याचा अभ्यास केला. लॉकडाऊन आहे तर टय़ुन्स बनवूया असं नाही केलं. लॉकडाऊन आहे तर टय़ुन सुचल्या असं होत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. टय़ुन्स केव्हाही गोंधळात किंवा कुठल्याही परिस्थतीत सुचतात. त्यामुळे संगीताशी संबंधित काय नवीन आहे आपल्याकडे बाजारात तसेच माझ्याकडे असलेल्या सॉफ्टवेअर वगैरे गोष्टींचा आढावा घेतला. कारण जेव्हा सगळं सुरू होईल तेव्हा नवीन काम हातात घेताना मला या उजळणी आणि अभ्यासाची मदत होईल.
या दिवसांत एक चांगली गोष्ट अशी झाली की, मी घरी वेळ दिला. दोन्ही वेळेला घरचं जेवू लागलो. ही एक चांगली सवय लागली. माझ्या दैनंदिनीतही चांगला फरक पडला. अनलॉक सुरू झालं तेव्हा माझी काही कामं सुरू झाली. ‘अनन्या’ फिल्मचं संगीत इत्यादी काही कामं या वेळेत पूर्ण करता आली.
या एवढय़ा मोठय़ा कालावधीत माझ्यासह अख्खं जग ज्या लाइफस्टाइलने पुढे जात होतं ती आपली अख्खी जीवनशैलीच चुकीची होती असं वाटतं. कारण लॉकडाऊनपूर्वी लोकं दररोज कामावर जायची आणि शनिवार-रविवारची वाट बघत बसायची. पुन्हा सोमवारपासून कामाची सुरुवात. हा जो आपल्या कामांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला. तसेच काही जण म्हणतात, या काळात आम्ही कुटुंबाला वेळ दिला तर लॉकडाऊनआधी त्यांना कुटुंबाला वेळ देऊ नये, असं नव्हतंच. कुटुंबाला वेळ देण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे, असं मला वाटत नाही. तसेच आपण कामही कुटुंबासाठीच करत असतो. महत्त्वाचं म्हणजे जे कुटुंबाला वेळ देत नव्हते त्यांना जाणीव झाली असावी की, आपलं कुटुंब आहे आणि वेळ देता यायला हवा.
ऑनलाइन कार्यक्रम सादर करण्याबाबत माझं असं मत आहे की, असे कार्यक्रम म्हणजे ऑनलाइन शाळेसाठी मुलं बसतात तसं वाटतं. यामध्ये तशी मजा आहे असं वाटत नाही. कारण हेडफोन लावून किती वेळ ऐकणार. प्रत्येकाकडे असणाऱया तांत्रिक वस्तू त्यातून येणारे आवाज वेगवेगळे असू शकतात. तोच ऑनलाइन कार्यक्रम यूटय़बवर टाकला तरी लोकांना पाहता-ऐकता येणार आहे. तरीही लोक अशा ऑनलाइन कार्यक्रमांचा किती आनंद घेतात याची कल्पना नाही. व्यासपीठ सजावट, लाइटस्, माहोल याची मजा काही वेगळीच असते. डिजिटल फरमँटला अशी जिवंतपणाची मजा नाहीच. कारण प्रेक्षक आणि कलाकारात एक वेगळं नातं असतं.
लॉकडाऊनमध्ये फार लाइव्ह कार्यक्रम करावे असं वाटलं नाही. छोटय़ा कलाकारांकडेही दुर्लक्ष झालं. त्यामुळे पुन्हा लाइव्ह शो केव्हा सुरू होणार याची मनापासून वाट बघतोय.



























































