
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
लडाख सीमेवर हिंदुस्थान-चीनमधील संघर्ष शिगेला पोहचलेला असतानाच रोहतांग पासला लेह-लडाखशी जोडणारा ‘अटल बोगदा’ पूर्ण झालाय. या मार्गातून लडाख येण्या-जाण्याचा मार्ग आता संपूर्ण वर्षभर खुला राहणार आहे. चीनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सैनिकांसाठी अटल बोगदा मोठा उपयोगी ठरणार आहे. कारण सेनेचे हत्यारं आणि इतर सामान आता वर्षभरात पोहचवले जाणं शक्य झालंय. सामरिकदृष्टय़ा अतिमहत्त्वाच्या अटल बिहारी वाजपेयी टनेल(बोगदा)चे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याची शक्यता आहे.
अटल बोगदा, पूर्वीचे नाव, रोहतांग बोगदा हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेले लेहवरील हिमालयातील पूर्व पीर पंजाल पर्वतरांगेत रोहतांग खिंडीत बनवलेला एक बोगदा आहे. लेह-मनाली महामार्ग लडाखकडे जाणाऱया दोन मार्गांपैकी एक आहे. रोहतांग खिंडीत हिवाळ्याच्या महिन्यांत जोरदार बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे वर्षातील फक्त 6 महिनेच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असतो. हिवाळ्यादरम्यान या बोगद्यामुळे हा महामार्ग आता खुला ठेवता येईल. लेहला जाणारा दुसरा मार्ग श्रीनगर-द्रस-कारगिल-लेह महामार्गावरील झोजीला खिंडीतून जातो आणि वर्षातून 6 महिने बर्फामुळे तो बंद असतो. झोजीला पासअंतर्गत 14 किमी (8.7मैल) लांबीच्या बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिमेकडील अक्साई चीन आणि सियाचीन ग्लेशियरला सामोरे जाणाऱया सैन्याला पुरवठा करण्यासाठी हे दोन मार्ग महत्त्वाचे आहेत.
या बोगद्याच्या निर्माणासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला, परंतु त्यामुळे आता वर्षभर हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला जोडलेला राहील. सोबतच मनाली ते किलाँग 115 किलोमीटरचा प्रवास 46 किलोमीटरचं अंतर यामुळे कमी झालंय. हा रस्ता 12 महिने प्रवासाच्या सोयीचा बनेल, थंडीमध्ये बंद पडणार नाही.
1998 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातच 3 जून 2000 साली या रोहतांग बोगदा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम ‘डिफेन्स रोड कन्स्ट्रक्शन एजन्सी’, ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ यांच्याकडे 6 मे 2002 रोजी देण्यात आले. ‘फिझिबिलिटी’ अभ्यास ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’कडून करून घेतला गेला आणि भौगोलिक अभ्यास जून 2004मध्ये झाला. संरचना व मार्गदर्शन तत्त्वे ‘ऑस्ट्रियन फर्म स्मेक इंटरनॅशनल’ने ठरवली. तांत्रिक बाजूंकरिता या प्रकल्पाला 2003 मध्ये, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2005मध्ये मान्यता मिळाली.
हा बोगदा 9.02 किमी लांब, 10.5 मी. रुंद व 5.52 मी. उंच असा असेल. या बोगद्याचे काम मे 2020मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु चिनी व्हायरसमुळे हे काम तीन-चार महिने विलंबाने झाले. हा बोगदा हिमाचल प्रदेश व लडाखसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. मनाली व लेह रस्त्यावरील 46 किमी अंतर कमी होणार आहे. हा रोहतांग खिंडीतला पर्यायी मार्ग ठरणार आहे. त्यामुळे पाच तासांचा प्रवास हा अवघ्या 2-3 तासांवर येणार आहे. अटल बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील 45 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास 12 हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात उंच बोगदा आहे, ज्याच्या निर्मितीसाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
‘स्ट्राबॅग एजी अफकॉन जॉईंट व्हेन्चर कंपनी’ला प्रकल्प पूर्ण करण्याकरिता अनेक अडचणींना चार वर्षे तोंड द्यावे लागले. त्यातील एक मुख्य अडचण होती 587 मीटर लांब सेरी नाला. बोगद्याच्या छतावरून पाणी वाहत होते व ते बंद करण्यासाठी बोगद्याची कामे झाल्यावर वॉटरप्रूफिंग’ करण्यात एक वर्ष गेले. तसेच दगड फोडण्याच्या कामांतही फार विलंब झाला. अटल बोगद्याच्या कामासाठी एकूण तीन हजार कंत्राटी मजूर कार्यरत होते व 750 नेहमीचे इंजिनीअर्स व टेक्निशिअन्सची टीम पूर्णवेळ काम करत होती. या भागात काम करायला मजूर मिळत नाहीत. फक्त सहा महिने काम करता येते. त्याकरिता तीन हजार मजूर प्रत्येक वर्षी झारखंडमधून आणले गेले. अशा या बोगद्याचे काम फार कठीण असे होते पण एकाही कामगाराला इजा झाली नाही वा कुणाचाही मृत्यू झाला नाही.
सामरिक महत्त्व
मनाली-लेह मार्गाकरिता आणखी तीन पर्यायी बोगद्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये बारालाचा खिंडीखालून 16 हजार 040 फूट उंचीवर 13.2 किमी लांबीचा बोगदा, लाचुंग खिंडीखालून 16 हजार 800 फूट उंचीवरून 14.78 किमी लांबीचा बोगदा, तगलांग खिंडीखालून 17 हजार 480 फूट उंचीवरून 7.32 किमी लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. हा नवीन बोगदा लडाखप्रमाणे पर्यटकांना लाभदायक ठरणार आहे. रोहतांग खिंडीमुळे या महामार्गावर अनेक वेळा वाहतूककोंडी होते. पण या नवीन बोगद्यामुळे पर्यटकांचा लेहचा प्रवास सोपा होईल. या बोगद्यामुळे पुढील थंडीमध्ये या मार्गावर अन्न व पुरवठा अडचणी कमी होतील.या अटल बोगद्यामुळे आता या विभागातील सर्वांगीण विकासाचे एकूणच चित्र पालटणार आहे.
अटल बोगदा प्रकल्प पूर्ण करणे हे ‘बीआरओ’साठीही मोठे आव्हानात्मक काम होते. बोगद्यामुळे हिंदुस्थान-चीन हद्दीपर्यंत अनेक किमींचे महामार्ग जाळे फार उपयुक्त ठरणार आहे. सध्या लडाखच्या पूर्वेकडे हिंदुस्थान -चीन तणाव असताना हा बोगदा प्रकल्प फार महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्यामुळे सुरक्षा बल, त्यांचे साहित्य लडाखच्या हद्दीपर्यंत कमी वेळात पोहोचू शकेल आणि चीनबरोबर लढण्याची क्षमता वाढणार आहे. लडाखमध्ये तैनात असलेल्या सैनिकांशी सहज संपर्क साधता येणं यामुळे शक्य होणार आहे. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातली लाहौल स्पीतीचा प्रवासही सोपा होणार आहे. कारण हाच बोगदा कुल्लू जिह्यातील मनालीहून लाहौल स्पीती जिह्याला जोडणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच हा बोगदा सैन्यदल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे. अटल बोगदा सर्वार्थाने हिमाचल प्रदेशात, लडाखच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.






















































