
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील तरुणीवरील बलात्कार प्रकरण तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अतिशय बेजबबादार, अमानवी पद्धतीने हाताळले आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशात पाठवण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात प्रताप सरनाईक म्हणाले की, जर अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलीस गुन्हा दाखल करून मुंबईत येऊ शकतात. मग हाथरस प्रकरणात तपास मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेशात जाऊन तपास करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी यावर त्करित कार्यवाही करावी अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. देशाला संतप्त करणाऱया मानवतेला काळीमा फासणाऱया हाथरस घटनेची चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसते. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी विनंती मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना करतो असे प्रताप सरनाईक यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.



























































