
>> कर्नल अभय बा. पटवर्धन
अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आता केवळ तीस दिवस उरले आहेत. यामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होतात की जो बायडेन, जो बायडेन कॅम्प ‘ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट’च्या (टीआयपी) रणनीतींतर्गत ट्रम्प यांना पदभ्रष्ट करण्यात सफल होतो की अमेरिकेचे प्रशासन विजयी ट्रम्प यांच्या मागे खंबीरपणे उभे राहते हे त्याच वेळी समजू शकेल. अमेरिकेत कोण विजयी होईल, कोणाची सरशी होईल हे येणारा काळच सांगेल.
अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांच्यात अतिशय चुरशीची निवडणूक होणार हे निश्चित आहे. विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तर ‘‘जर मला वाटले की, निवडणूक निःपक्षपाती नव्हती किंवा त्यात घोटाळा झाला आहे असे वाटले तर मी सत्तेचे सुलभ हस्तांतर करणार नाही’’ अशी नाटय़मय घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. अर्थात नंतर त्यांनी घूमजाव केले ते अलहिदा. 3 नोव्हेंबरलाच अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटही (मेल इन व्होटस्) सुरू होईल. नेहमी या बॅलेटद्वारे अमेरिकेचे जवळपास 10-12 टक्के मतदार आपले मतदान करतात. त्यात सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे धास्तावलेले 50 टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिक यावेळी मेल इन/इलेक्ट्रॉनिक बॅलेटचीच कास धरतील असा तज्ञांचा कयास आहे.
बूथवर झालेल्या मतदानानंतरही बराच काळ ही इलेक्ट्रॉनिक मते येतच (डिलज ऑफ मेल इन व्होटस्) असतात. बूथची मोजणी संपली तरी ‘मेल इन’ मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकीचा निकाल जाहीर होत नाही. बूथ पोलिंग झाल्यानंतर त्याच्या तथाकथित सर्वेक्षणाचा परिणाम उशिरा केल्या गेलेल्या/झालेल्या ‘मेल इन व्होटस्’वर होतो आणि त्यामुळे मतदानाचा आराखडा तर दोलायमान (स्विंग इन व्होटिंग पॅटर्न) होतोच, पण अंतिम निकालही पूर्णपणे बदलू शकतो. म्हणूनच ‘या मधल्या कालखंडात माझ्याविरुद्ध अपप्रचाराची राळ उडवण्यात येईल आणि त्याची परिणती सामाजिक किंवा वांशिक दंग्यांमध्ये होऊन मेल इन व्होटर्सची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल’, अशी भीती डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते आहे. याचाच पुनरुच्चार त्यांनी फॉक्स न्यूज एजन्सीच्या टीव्हीवर 29 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियात झालेल्या ‘फर्स्ट प्रेसिडेन्शियल डिबेट’मध्येही केला. ट्रम्प यांना वाटणाऱया भीतीमागे ‘गेट स्टोन इन्स्टिटय़ूट’मधील शोधकर्ता विद्वान फाररेल याचा निवडणूकपूर्व अहवाल आहे.
फाररेल याच्यानुसार काही असंतुष्ट प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ सैनिकी अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे बादशहा यांनी ‘ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्टः टीआयपी’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यांच्या ‘थिंक टँक’ने ऑगस्टमध्ये 22 पानांचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. टीआयपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांनुसार बूथ व्होटिंग झाल्यानंतर जर मेल इन व्होटर्सची योग्य प्रमाणात जमवाजमव (मास मोबिलायझेशन) करता आली तर 2016 मध्ये रशियन सरकारला (रशिया गेट) जे शक्य झाले नाही किंवा करता आले नाही ते कार्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव आपल्याला करता येईल. ख्रिस फाररेलनुसार टीआयपीला पडद्यामागील सूत्रधार (पॉवर ब्रोकर्स), त्यांचे डेमोक्रॅटिक मित्रमंडळ आणि चीनचा खुला सर्वंकष पाठिंबा आहे.
ख्रिस फाररेल याचे अनुमान अचूक आहे. कारण मागील काही दिवसांत अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये अमेरिकेतील जनतेत राजकीय संभ्रम व तिरस्कार, प्रशासनविरोधी बंड, आर्थिक/सामाजिक दिशाभूल आणि वांशिक विखार निर्माण करणारे अनेक लेख/चर्चा यांचे पेव फुटलेले दिसत आहे. जो बायडेन या टीआयपी विचारधारेचे खुले समर्थक नसतीलही, पण त्यांनी टीआयपीच्या पडद्यामागील, कुटील व सत्ता तसेच रक्तपिपासू सूत्रधारांच्या विरोधात निषेध व्यक्त केल्याचेही कुठे आढळून आलेले नाही. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेनंतरही त्यांनी याबाबत मौन व्रत सोडलेले नाही. टीआयपीच्या सूत्रधारांना कोणत्याही परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा डाव खेळू द्यायचा नाही. त्यांना ते नको आहे. कारण मागील चार वर्षे ट्रम्प यांनी टीआयपी, त्यांचे समर्थक चीन/रशिया, अमेरिकन वित्तसम्राट आणि तेथील डाव्या विचारसरणीचे लोक यांच्या आर्थिक हितसंबंधांवर सतत घाला घातला आहे. व्यापारी संबंध खारीज करून त्यांनी चीन व डाव्या अमेरिकनांना हादरवले आहे. हिंदुस्थानला खुले समर्थन देऊन त्यांनी मुस्लिम लॉबी आणि मुस्लिम मतदारांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव होईपर्यंत हे सर्व लोक आणि त्यांचे समर्थक स्वस्थ बसणार नाहीत.
ट्रम्प प्रशासन निवडणुकीत घपला करेल, निवडणूक पद्धतीतील गडबड/निकालाकडे दुर्लक्ष करेल, निवडणुकीच्या महत्त्वाला नाकारेल/गौणत्व देईल किंवा निवडणूक प्रक्रियेत गोंधळ माजवेल या शंकेने आणि ते थांबवण्यासाठी टीआयपी स्थापन करण्यात आली आहे, असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे. ‘‘येनकेन प्रकारेन मी सत्तेत आलोच पाहिजे’’ या एकमेव उद्देशाने डोनाल्ड ट्रम्प नोव्हेंबरमधील निवडणुकीत कायदेशीर तसेच प्रशासकीय गोंधळाची स्थिती निर्माण करतील. निवडणुकीत पराभूत होण्याचे परिणाम दिसू लागताच किंवा झाल्यावर ट्रम्प त्याविरुद्ध न्यायालयात जाऊन निकालावर .स्थगिती आणतील हे करण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टात आपला उमदेवार सरन्यायाधीश म्हणून हवा आहे. म्हणूनच त्यांनी त्या पदासाठी नामनिर्देशित केलेल्या ऍमी कोने ब्रेट यांच्या नियुक्तीला अमेरिकन सिनेटने निवडणुकीआधी मंजुरी द्यावी यासाठी ट्रम्प आकाशपाताळ एक करीत आहेत, असेही जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. जॉर्ज टाऊनची कायदा तज्ञ, हिलरी क्लिंटन आणि पेंटागॉनची सल्लागार असलेली रोझा ब्रूक्स आणि माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट असलेल्या कॉलिन पॉवेलचे चीफ ऑफ स्टाफ, निवृत्त कर्नल लॉरेन्स विलियम हे ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्टचे संस्थापक आणि विद्यमान प्रवक्ते आहेत. झो हडसन आणि जॉर्ज सोरोस हे पीआयटीचे संचालक (डायरेक्टर्स) आहेत. हे चारही महानुभाव अमेरिकेतील कुख्यात ओपन सोसायटी फाऊंडेशनमधे एकत्र कार्यरत होते. ओपन सोसायटी फाऊंडेशन म्हणजे अमेरिकेतील वर्णद्वेषाला चालना देणारी, 2014 मध्ये झालेले युक्रेनमधील वर्णद्वेषी युद्ध आणि 2016 मध्ये अरब प्रिंग उठावाला चालना देणारी आणि अनेक देशांत हिंसकरीत्या सत्तापालट करून त्यावर आपली आर्थिक पोळी भाजणारी संस्था आहे. अमेरिकेतील राज्यांमध्ये प्रचलित असलेली पोलीस व्यवस्था खारीज करून तेथे फेडरलाइझ्ड पोलीस व्यवस्था आणावी यासाठीही ही संस्था सक्रिय कार्यरत आहे.
ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट ही संस्था आणि त्याची उपशाखा असलेली न्यू अमेरिका या विचारगोष्टीला (थिंक टँक) आर्थिक मदत करणाऱयांविषयी सिलिकॉन व्हॅलीचे बिल गेट्स (मायक्रोसॉफ्ट), एरिक श्मिट (गुगल), रिड हॉफमन (लिंक्ड इन) आणि जेफ्री स्कॉल व पियर ओमिडयार (इ बे) सारखे दिग्गज आहेत. रँकिंग डिजिटल राइटस्वर संशोधन करण्यासाठी न्यू अमेरिका थिंक टँकला स्टेट डिपार्टमेंटनी लक्षावधी डॉलर्स दिले आहेत. यापैकी 7 एरिक श्मिट आणि पियर ओमिडयार यानी 2016 मध्ये हिलरी क्लिंटन निवडून यावी म्हणून आकाशपाताळ एक केले होते. तर यावेळी बर्नी सँडर्सऐवजी जो बायडेन डेमोक्रॅटिक उमेदवार व्हावेत यासाठी रिड हॉफमन यांनी प्राथमिक पातळीवर जीवतोड मेहनत केली होती. ट्रम्प प्रशासनाने मागील चार वर्षांमध्ये बाह्य देशांमधील अमेरिकन सैनिकांच्या संख्येत कपात केली. त्या देशांना देण्यात येणाऱया आर्थिक मदतीला चाप लावला आणि अमेरिकन संस्था/संघटनांच्या बाह्य देशांमधील हस्तक्षेपावर बंदी घालून डोनाल्ड ट्रम्प यांनी या व अशा संस्था तसेच संघटनांचे कंबरडे मोडले आहे.
अमेरिकेतील राजकीय विश्लेषक पॉल क्रेग रॉबर्टस् हे ‘अमेरिकाज कलर रिव्होल्यूशन’ या पुस्तकानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे दुखावलेले अमेरिकन धनदांडगे, लष्कर आणि प्रसारमाध्यमे ‘जिंकून येण्यासाठी ट्रम्प निवडणुकीत धांदली करतील किंवा हरल्यास सत्ता हस्तांतर करणार नाहीत’ ही भावना जनतेच्या मनात बिंबवत आहेत. निवडणुकीचा निकाल लागून ट्रम्प विजयी झाल्यास अंतिफा आणि ब्लॅक लाइव्हज या संघटना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलनांचा गोंधळ घालतील आणि ही आंदोलने ट्रम्पच्या हुकूमशाही विरोधात आहेत हे अमेरिकन जनता व जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आता केवळ तीस दिवस उरले आहेत. यामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होतात की जो बायडेन, जो बायडेन कॅम्प ‘ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट’च्या (टीआयपी) रणनितींतर्गत ट्रम्प यांना पदभ्रष्ट करण्यात सफल होतो की अमेरिकेचे प्रशासन विजयी ट्रम्प यांच्या मागे खंबीरपणे उभे राहते हे त्याचवेळी समजू शकेल. अमेरिकेत लोकशाही विजयी होईल की कारस्थान्यांची सरशी होईल हेदेखील येणारा काळच ठरवेल.
यावेळी 3 नोव्हेंबरची रात्र अमेरिकेत नेहमी होते तशी ‘इलेक्शन नाईट’ म्हणून साजरी होणार नाही. कोरोनाच्या भीतीमुळे असंख्य मतदार ‘मेल इन बॅलेट’ सुविधा वापरतील. त्यामुळे संगणकीय मतदान दीर्घकाळ सुरू राहील. प्रसारमाध्यमे, स्वयंसेवक आणि नेते या विलंबाचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकणे, प्रचलित व्यवस्था कशी निकामी आहे हे पटवून देणे आणि प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणे यासाठी करतील. म्हणूनच ‘टीआयपी’ला निवडणूक कालावधी जेवढा जास्त खेचता येईल तेवढा खेचण्यात स्वारस्य आहे. कारण त्यामुळे जनतेत दुफळी माजेल. त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडून जाईल किंवा डळमळीत होईल. अनेक ठिकाणी दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न होईल. त्याआड संवैधानिक पद्धतीने हल्ले करून डोनाल्ड ट्रम्प यांना पदभ्रष्ट करता येईल याचा बायडेन कॅम्पला विश्वास आहे. वाचकांना या सर्व विवेचनात, देशांतर्गत निवडणूक शैलीचा आणि 2019 च्या मे महिन्यातील वातावरणाचा परिचित भास झाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.






























































