फेडरर, सेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार, टेनिस ऑस्ट्रेलियाचे प्रमुख क्रेग टिले यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वाधिक 20 ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर व मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणारी सेरेना विल्यम्स 2021 साली होणाऱया ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती टेनिस ऑस्ट्रेलियाचे प्रमुख क्रेग टिले यांनी रविवारी दिली.

क्रेग टिले पुढे म्हणाले, ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा 18 ते 31 जानेवारी या कालावधीत खेळवली जाईल. पण त्याआधी ऑस्ट्रेलियातील शहरामध्ये ‘बायोबबल’ तयार करण्यात येईल. सहा आठवडे टेनिससाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. खेळाडूंसाठी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असणार आहे. तसेच सराव स्पर्धाही खेळवण्यात येणार आहेत.

टेनिसकोर्टवर उतरण्यासाठी सज्ज – फेडरर
य्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रॉजर फेडररला उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली होती. त्यानंतर दुखापत व कोरोनामुळे तो एकाही स्पर्धेत खेळू शकलेला नाही. मात्र या कालावधीत विश्रांती घेत स्वित्झर्लंडचा हा पठ्ठय़ा आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. रॉजर फेडरर याप्रसंगी म्हणाला, कोरोनामुळे विश्रांतीसाठी आणखी वेळ मिळाला. मात्र आताही मी कोर्टवर फक्त दोन तास सराव करतोय. टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी सज्ज होतोय. ऑस्ट्रेलियन ओपन डोळ्यांसमोर ठेवले आहे.