अग्निशमन दलातील रिक्त पदे भरणार!  नवीन भरतीला आयुक्तांची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील 25 टक्के रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. या भरतीला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे.

पालिकेच्या अग्निशमन दलातील रिक्त पदामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण वाढत होता. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या रिक्त पदांची आकडेवारी समोर आली होती. याबाबत दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी लेखी तक्रार केली होती. यानुसार मुंबई अग्निशमन दलाने अनिल गलगली यांस कळविले आहे की, मुंबई महापालिकेने 30 सप्टेंबर 2019 रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे रिक्त पदे भरता आलेली नव्हती. मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी महापालिका आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यात मान्यता दिली आहे. यानुसार ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

अग्निशमन दल आणखी सक्षम होणार

मुंबई अग्निशमन दल ही अत्यावश्यक सेवा असून रिक्त पदे भरल्यानंतर कामकाजास वेग येईल, अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी दिली. रिक्त पदे भरल्याने अग्निशमन दल आणखी सक्षम होणार आहे.