जालना – मासेमारीसाठी गेलेला तरुण बुडाला, 38 तासानंतर मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथून जवळच असलेल्या पद्मावती प्रकल्पात शनिवारी सायंकाळी मासेमारी करण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्यात बुडाला होता. रविवारी सकाळपासून बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह प्रकल्पाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. अरुण तुकाराम पवार (वय -32, रा. मासरुळ ता. जि. बुलढाणा)असे यक तरुणाचे नाव आहे.

अरुण हा तरुण शनिवारी भोकरदन तालुक्यातील पद्मावती प्रकल्पात मासेमारी करण्यासाठी गेला होता. परिसरात यावर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने पद्मावती प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. मासेमारी करतांना अरुणला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रकल्पाकडे गेले. तेंव्हा त्याची मोटारसायकल आणि चप्पल प्रकल्पाच्या काठावर आढळून आली. यावरून अरुण हा प्रकल्पाच्या पाण्यात बुडला असा अंदाज लावत नागरिकांनी सदर माहिती बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. सदर पथक तात्काळ पद्मावती प्रकल्पावर दाखल झाले.

या पथकाने रविवारी सकाळ पासून बोटीद्वारे शोध मोहीम राबविली मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी अंधार पडल्याने या पथकाने शोध मोहीम थांबवली. सोमवारी मासरुळ येथील काही ग्रामस्थ अरुणचा काही शोध घेण्यासाठी प्रकल्पाकडे गेले असता सकाळी सात वाजेच्या सुमारास तब्बल 38 तासानंतर मृतदेह प्रकल्पातील पाण्यावर तरंगताना आढळून
आला.