
तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्स आजपासून सुरू झाली. तळीरामांसाठी तर खुशखबरच मिळाली. लॉकडाऊनपूर्वी रात्रीचे बारा वाजेपर्यंतच बार उघडे राहत होते. आता ते दीड वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत. शेवटची ऑर्डर मात्र साडेबारा वाजता घेतली जाणार आहे अशी माहिती असोसिएशन फॉर हॉटेल्स ऍण्ड रेस्टॉरन्ट्स (आहार) या संघटनेकडून मिळाली आहे.
सहा महिन्यांनंतर आज तळीरामांचे घसे ओले झाले. पहिल्या दिवशी बार आणि रेस्टॉरन्ट्स किरकोळ संख्येने उघडे होते. पण सोशल डिस्टन्सिंगसाठी आतील बदललेली व्यवस्था पाहण्यासाठी अनेकांनी बार आणि रेस्टॉरन्ट्सजवळ चकरा मारल्या. मुंबईतील 50 टक्के बार आणि रेस्टॉरन्ट्सनी सॅनिटायझेशनचे काम पूर्ण केले असल्याचे ‘आहार’ संघटनेने म्हटले आहे. ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांना ताप, सर्दी, खोकला नाही याची खात्री केली जाणार आहे. दिवसातून दोन वेळा बार, रेस्टॉरन्ट्स यांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे तसेच आतील कामगारांचीही वेळोवेळी तपासणी केली जाईल असे संघटनेने म्हटले आहे.
‘आहार’ संघटनेने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत बार-रेस्टॉरन्ट्स उघडे राहतील असे म्हटले असले तरी महानगरपालिका आयुक्तांनी मात्र पूर्वीचेच नियम कायम राहतील असे स्पष्ट केले आहे. सध्यातरी 33 टक्के क्षमतेनेच बार, रेस्टॉरन्ट्स सुरू करण्याची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रेस्टॉरन्ट्स उघडली, पण ग्राहकसंख्या किरकोळ
मुंबईतील रेस्टॉरन्ट्स सोमवारी उघडली खरी पण ग्राहकांचा प्रतिसाद मात्र किरकोळ होता. हाताला सॅनिटायझर लावून आणि टेम्परेचर तपासूनच ग्राहकांना आत प्रवेश दिला गेला. गर्दी होऊ नये म्हणून टेबलांची रचनाही बदलण्यात आली होती. ग्लासांमध्ये पाणी देण्याऐवजी मिनरल वॉटरच्या बाटल्या ठेवण्याचा उपायही अनेक रेस्टॉरन्ट्सनी केल्याचे दिसून आले.


























































