
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सतत येत असलेल्या तांत्रिक अडचणी साध्यासोप्या नसून विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अॅटॅक झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेच्या सर्व्हरवरच हा अॅटॅक झाल्याने या तांत्रिक अडचणी निर्माण होऊन गोंधळ माजला आहे. विद्यापीठानेच याची माहिती दिली आहे. दरम्यान, यामुळे आजच्या आणि उद्या 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून परीक्षेच्या सुधारीत तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सलग दुसरा पेपरही बुडाला. पेपरकोड, परीक्षेची लिंक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना मंगळवारी होणारी परीक्षाही देता आली नाही. सलग दोन परीक्षा बुडाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये धाव घेतली पण विद्यापीठाकडून कोणतीही सूचना मिळत नसल्याने अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर जोरदार निदर्शने केली.
शनिवारी 3 ऑक्टोबरपासून आयडॉलच्या परीक्षेला सुरूवात झाली. पेपरकोड, परीक्षा लिंकअभावी विद्यार्थ्यांना पहिला ऑनलाईन पेपरही देता आला नाही. हा गोंधळ मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेवेळी सुरूच होता. आयडॉलच्या बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र 6 व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेस सुरुवात झाली आहे. आज दुसरा पेपर होणार होता. पण या परीक्षेलाही तांत्रिक अडचणींचा फटका बसला.
चौकशी करून दोषींवर कारवाई करा- युवा सेनेची मागणी
मुंबई विद्यापीठाच्या विविध विभाग आणि दूरस्थ व मुक्त शिक्षण (आयडॉल) विभागाच्या परीक्षांमध्ये होत असलेल्या गोंधळाची चौकशी करून दोषी जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी युवा सेनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. गेल्या 3 ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या विविध परीक्षा सुरू झाल्या आहेत. सतत होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. या गोंधळामुळे निराशेच्या गर्तेत गेलेले विद्यार्थी आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेऊ शकतात याची गांभीर्याने दखल घेऊन याप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी केल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.





























































