
>> वरद चव्हाण (अभिनेता)
सध्या काही नवीन प्रोजेक्ट आहेत पण ते पेपरवरच आहेत. त्यामुळे घरच्या घरी आता मी स्वतःचे ‘वरद विजय चव्हाण’ हे यूटय़ुब चॅनेल सुरू केले आहे. त्याच्यात कधी डान्स व्हिडीओ असतात, सध्याच्या परिस्थितीवर मला काय वाटते त्याच्यावर हलके फुलके स्क्रिप्ट बनवतो, कधी कुकिंगचे व्हिडीओ असतात. त्यामुळे मला ज्या ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचता येईल त्या त्या प्रकारे मी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.
यापूर्वी जेव्हा माझे शूट नसायचे तेव्हा मी जास्तीत जास्त वेळ घरीच असायचो. मी फार सोशल नाही आहे. शूटिंगनंतर थेट घरी जायचे हे मी बाबांकडूनच शिकलो आहे. मुळात या अख्ख्या लॉकडाऊनमध्ये मला घरी काम करायला येणाऱया मावशींची किंमत कळली. त्यांचे किती मेहनतीचे आणि कष्टाचे काम असते ते मला कळले. जेव्हा स्वतःला केर, लादी, भांडी करावी लागत होती आणि ते करून जेव्हा दुसऱया दिवशी जसं अंग दुखायचं. ते काम सलग तीन चार दिवस केल्यानंतर एक दिवस कंटाळा यायचा, हात-पाय दुखायचे, अंग जड व्हायचं. तेव्हा त्यांची किंमत कळली. या सगळ्याची कारणं न देता सातत्याने त्यांचे काम करत असतात, त्यांचं काम किती महत्त्वाचं असतं आणि आपण त्यांना फार गृहीत धरत असतो, पण त्या नसल्यावर आपलं आयुष्य किती थांबतं, ते नसताना आपलं आयुष्य किती अस्ताव्यस्त होतं आणि होईल याची जाणीव या पाच-सहा महिन्यांत झाली. या काळात आम्ही प्रत्येकजण काम वाटून घेत होतो. त्यामुळे एखादा दिवस मला कामाचा कंटाळा आला की आई भांडी, केर वगैरे करायची. बायकोचे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तिने स्वयंपाकाची जबाबदारी घेतली होती. मुळात घर स्वच्छ ठेवायला किती मेहनत घ्यावी लागते हे या पाच सहा महिन्यांत जास्त कळलं. आम्ही वेगवेगळ्या रेसिपीज शोधायचो आणि ते मी, आई, बायको मिळून बनवायचो. त्यात वेगळी मजा येत होती. यात एका निशाण्यात दोन कामं व्हायची. नवीन रेसिपीज पण बनवायचो, त्या शूट पण करायचो आणि माझ्या ‘वरद विजय चव्हाण’ या यूटय़ुब चॅनेलवर पण टाकायचो. एरव्ही कुटुंबासोबत तितकासा संवाद व्हायचा नाही पण तो लॉकडाऊनमध्ये वाढला. कारण मी, आई, बायको आम्ही एकदम डेली सोपवाले नाही. संध्याकाळी टीव्ही लावला की थेट दहा वाजता बंद करायचा असे नव्हते. पण टीव्ही बघण्यापेक्षा एकमेकांशी गप्पा मारणं, एखादा दिवसभरातून चित्रपट बघणं किंवा झोपताना एखादी वेबसिरीज बघणं यात वेळ घालवायचो. एकमेकांच्या मनात नकारात्मक गोष्टी येऊ नयेत आणि जर आल्याच तर एकमेकांचे मन मोकळे व्हावे त्यासाठी आम्ही तिघेही जण प्रयत्नशील होतो. कारण या काळात आजूबाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता, दरदिवशी वेगळं काहीतरी ऐकायला मिळत होते. त्याने मानसिक आरोग्य खचत चालले होते, तसेच आमच्या क्षेत्रात असे आत्महत्या केल्याचे, नैराश्यात गेल्याचे किस्से ऐकू येत होते. त्यामुळे या पाच सहा महिन्यांत मी जरी घरी असलो किंवा माझ्या बायकोचे वर्क फ्राम होम होते. त्यांच्या कामाचे टेन्शन वेगळे असतात. कधी कामाची डेडलाइन, कामाचं प्रेशर, स्वयंपाक आणि ऑफिसचे काम अशी तारेवरची कसरत या सगळ्यात आम्हाला तिघांपैकी कोणीही एक डाऊन वाटले की आम्ही त्यांचा थोडा मूड बदलायचो. थोडीशी मजामस्ती करून थोडसं रिलॅक्स करायचो. त्यामुळे घरात जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण कसे राहील याचा प्रयत्न करायचो. आपल्याला शाळेपासून स्वच्छतेचे धडे दिले जातात. बाहेरून घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुणे, कचरा इथे तिथे न फेकता कचरापेटीत टाकणं, काही खाल्ल्यावर लगेच हात धुणं, स्वतःची स्वच्छता राखणं हे सगळं शिकवलं जाते. पण त्याकडे आपण गांभीर्याने पाहत नाही. त्याची गरज का आहे हे कोरोनाने दाखवून दिले. मुळात स्वच्छतेची जाणीव करून दिली.
आम्ही गरज असेल तेव्हाच बाहेर पडतो. घरातून बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडणं, हात सॅनिटाइज करणं, बाहेरून आल्यावर आपला हात घरात कुठल्याही वस्तूला न लावता थेट बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करणं, हात पाय स्वच्छ करणं या गोष्टीची काळजी घेतो. आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मास्क आले आहेत, ते वापरताना चांगल्या प्रकारचा मास्क वापरणे गरजेचे आहे. ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे. माझ्या मते आपल्या वातावरणाला मास्क सूट होत नाही. कारण इतका घाम येतो की ते मास्क घातल्यावर गुदमरायला होतं. बाहेर पडल्यावर ते मास्क सतत घालून राहणं त्रासदायक होतं, त्यामुळे काहीजण मास्क लावतात पण बऱयाचदा ते मास्क तोंडावर कमी आणि हनुवटीवर जास्त पाहायला मिळते, पण तसे न करता ते आपल्या आणि आपल्या संपर्कात येणाऱया प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी आहे याचे भान सगळ्यांनीच राखले पाहिजे. त्यामुळे काही झाले तरी मास्क घालणे गरजेचे आहे हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे.

























































