मराठा क्रांती मोर्च आंदोलकांवरील गुन्हे महिनाभरात मागे घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे एक महिन्याच्या आत मागे घेण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे या आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याबाबतचा ‘जीआर’ निघाला आहे.

मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची सातत्याने मागणी सुरू होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेतला होता. आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु असून त्यावर एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय(जीआर) जारी केला आहे.

धनगर आरक्षणासाठी पाठपुरावा
धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत करण्याच्या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची कोंडी फोडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. या समाजाच्या आर्थिक विकासाच्या तसेच अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. शिष्टमंडळासमवेत झालेल्या या बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री अण्णा डांगे, खासदार विकास महात्मे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, रामराव कडकुते, अनिल गोटे उपस्थित होते.

नोकरीबाबतही निर्णय जारी
मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचाही निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला होता. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेही शासन निर्णय जारी झाला आहे. या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. महामंडळाकडे नोकरीचे प्रस्ताव आल्यावर त्यावर एका महिन्याच्या आत नोकरी घेण्याबाबत कार्यवाही करावी असे यामध्ये नमूद केले आहे. राज्याच्या गृहविभागामार्फत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

जीआरमध्ये काय म्हटले आहे
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. यात फक्त 26 प्रकरणे प्रलंबित असून त्यावर एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्यात यावी असे जीआरमध्ये नमूद केले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.