
कोरोना विषाणूबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. यातून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता ऑस्ट्रेलियातील ‘नॅशनल सायन्स एजन्सी सीएसआयआरओ’ने केलेल्या ताज्या संशोधनात एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. सीएसआयआरओच्या मते एका विशिष्ट वातावरणात कोरोना विषाणू अधिक काळ जिवंत राहतो.
व्हायरलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या सीएसआयआरओच्या संशोधनानुसार 20 डिग्री सेल्सियस तापमानात असणाऱ्या मोबाईल स्क्रीन, नोटा आणि काचेवर कोरोना विषाणू तब्बल 28 दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात तापमान कमी झाल्यावर या विषाणूचा फैलाव आणखी वेगाने वाढण्याची शक्यता तज्ञांजी व्यक्त केली आहे.
सीएसआयआरओचे संशोधक शेन रिडेल यांनी आपल्या अभ्यासाबाबत सांगितले की, हे संशोधन सतत हात धुणे, सॅनिटाईझ करणे आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर घ्यावयाची काळजी अधोरेखित करते. संशोधकांनी अभ्यासासाठी कृत्रिम चुईंगमचा वापर केला. अभ्यासादरम्यान चुईंगमवरील विषाणू नष्ट होण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागल्याचे दिसून आले.
संशोधकांनी 20, 30 आणि 40 डिग्री तापमानात हा प्रयोग केला. यावेळी थंड तापमानात विषाणू अधिक वेळ जिवंत राहत असल्याचे निदर्शनास आले. चकचकीत जागा (जसे की काच, मोबाईल स्क्रीन) आणि नोटांवर विषाणू अधिक काळ तग धरून बसल्याचे संशोधनात दिसले.
























































